शेकडो ख्रिस्ती आंदोलनकर्त्यांचे मडगाव येथे ठिय्या आंदोलन : वाहतूक ठप्प

  • प्रा. सुभाष वेलिंगकर फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी केल्याचे प्रकरण

  • वाहतूक बंद केल्याने अनेकांना करावी लागली पायपीट

  • प्रा. वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

(‘डी.एन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’ म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक)

पणजी, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करून प्रा. वेलिंगकर यांना कह्यात घेण्याची मागणी शेकडो ख्रिस्ती आंदोलनकर्त्यांनी सलग दुसर्‍या दिवशी मडगाव येथे आंदोलनाद्वारे केली. या वेळी शेकडो आंदोलनकर्त्यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी दुपारी मडगाव येथे जुने सर्कल आणि कदंब बसस्थानकाजवळचा रस्ता रोखून धरला अन् वाहतूक ठप्प केली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. एका दुचाकीस्वाराने वाहतूक रोखल्याबद्दल विचारल्यावर त्याचे शिरस्राण काढून त्याला मारहाण करण्यात आली.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांना कह्यात न घेतल्यास ७ ऑक्टोबर या दिवशी ‘दक्षिण गोवा बंद’ची चेतावणी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. ४ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी उशिरा डिचोली पोलिसांनी फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम २९९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या प्रा. वेलिंगकर यांच्या शोधात आहेत. प्रा. वेलिंगकर यांनी पणजी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

आंदोलनामुळे अनेकांना करावी लागली पायपीट

मडगाव येथे ५ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून सुमारे ४०० ते ५०० आंदोलनकर्ते जुने सर्कलजवळ ठाण मांडून बसले होते, तसेच हे आंदोलनकर्ते पोलिसांना न जुमानता येणार्‍या वाहनांना अडवून परतवत होते. त्यामुळे शाळकरी मुले, कामावरून घरी परतणारे कामगार, व्यावसायिक, पायलट, प्रवासी आणि पर्यटक यांना चालत १ ते २ किलोमीटर पायपीट करावी लागली. कडक उन्हात पर्यटक आणि प्रवासी यांना आणखी त्रास झाला. सासष्टीचे मामलेदार प्रतापराव गावकर यांनी आंदोलनकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलनकर्त्यांनी पोलीस आणि शासकीय अधिकारी यांचे न ऐकता आंदोलन चालूच ठेवले. प्रारंभी ख्रिस्ती महिला, युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिक यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी मडगाव पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि प्रा. वेलिंगकर यांना तातडीने कह्यात घेण्याच्या मागणीवरून मोर्चा काढला.

त्यानंतर नेत्या प्रतिमा कुतिन्हो, वॉरेन आलेमाव, सावियो कुतिन्हो आणि इतर आंदोलनकर्ते यांनी मडगाव पोलीस ठाणे ते जुने सर्कल या परिसरात मोर्चा काढला. यामुळे या परिसरातील वाहतूक ठप्प झाली. ५ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मडगाव येथे रवींद्र भवन येथे एका कार्यक्रमासाठी येणार असल्याचे कळताच आंदोलनकर्ते त्यांना भेटायला रवींद्र भवन येथे येणार होते; मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी तेथे जाणे टाळले. यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन आणखी प्रखर केले.

ताळगाववासियांची पणजी पोलीस ठाण्यावर धडक

पणजी – सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, अशी चेतावणी ताळगाववासियांनी मोठ्या संख्येने ५ ऑक्टोबर या दिवशी पणजी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन दिली. याप्रश्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात गप्प का आहेत ? त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

मडगाव येथील आंदोलनाला हिंसक वळण

मडगाव – कोलवा सर्कल येथे जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी शहरात येणारी वाहतूक, कोलवा आणि रवींद्र भवन सर्कल येथील वाहतूक अडवून जनतेला वेठीस धरले. जमावाने घरी जाऊ पहाणार्‍या दुचाकीस्वाराला त्याचेच शिरस्राण त्याच्या डोक्यावर मारून घायाळ केल्याची घटना घडली. जमावावर कोणतेही नियंत्रण नव्हते, हे यावरून सिद्ध झाले. जिल्हा रुग्णालयात जाणारे रुग्ण, आरोग्य केंद्रांमधून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना घेऊन आलेल्या रुग्णवाहिका आणि बाजारासाठी आलेल्या लोकांना अडवून आंदोलनकर्त्यांनी कायदा हाती घेतला.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा प्रा. सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा

प्रा. वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ पर्वरी येथे ६ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. येथील हिंदुत्वनिष्ठांनी फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाविषयी सत्य बाहेर येण्याविषयी सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे.

धार्मिक सलोखा बिघडवू पहाणार्‍यांच्या कृत्याला शासनाने बळी पडू नये !

प्रा. सुभाष वेलिंगकर यांना समर्थन देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते ५ ऑक्टोबरला डिचोली पोलीस ठाण्यात जमा झाले होते. प्रा. वेलिंगकर यांनी फ्रान्सिस झेवियर यांच्यासंबंधी केलेले विधान हे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेले विधान नव्हते. इतिहास सर्वांच्या समोर यावा, हा यामागील हेतू होता. राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवू पहाणार्‍यांच्या कृत्याला शासनाने बळी पडू नये आणि शासनाने सत्य इतिहास पुढे आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी डिचोली येथे पत्रकारांशी बोलतांना केली. धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी राजकीय पक्ष सक्रीय झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.