सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ह्यांचे ज्येष्ठ बंधू अनंत आठवले हे वयोमानानुसार शरीर थकल्याने आता सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमात येत नाहीत. पण बरेच दिवसांनी, एकदा पुन्हा आश्रम पाहावा ह्या विचाराने दि. १९.०९.२०२४ ला आश्रमात येऊन परमपूज्यांना भेटले. परत जाण्याच्या आधी अचानक त्यांच्या मनात ‘सर्व साधकांना आनंद होईल असे काहीतरी सांगावे’, असा विचार आला. त्यांनी त्यावेळी जे सांगितले ते पुढे दिले आहे.
‘आश्रमातील सर्व साधकांना, बाहेर राहूनही सनातन संस्थेच्या कार्यासाठी दिवसभर स्वत:ला वाहून घेतलेल्या साधकांना, आनंद होईल अशी एक गोष्ट सांगायची आहे, ती ही की तुम्ही सर्व सनातनचे साधक तुमच्या परमगुरुंच्या कृपेने मुक्तीच्या जवळ पोहोचत आहात. कसे ? ते पण सांगतो.
मनुष्य दिवसभर कोणती तरी कर्मे करतच असतो. क्वचित् एकादे नको ते कर्म हातून घडते आणि पाप लागते. दुसर्यांच्या हिताचेही कर्म घडू शकते आणि त्याने पुण्य मिळते. हे क्रियमाण असते, म्हणजे भोगण्यासाठी नवे जोडलेले पाप-पुण्य. तुमच्या परमगुरुंनी तुम्हा सर्वांना चांगले संस्कार तर दिलेच, पण त्याच बरोबर दिवसभर सेवेत गुंतवून ठेवले आहे. चांगल्या संस्कारांमुळे मनात चांगले विचारच राहतात, पापाकडे प्रवृत्तीच होत नाही आणि सतत सेवेत राहिल्याने हातून पापकर्म घडण्याची संधीच रहात नाही. दुसरे असे की पुण्यकर्मसुद्धा मुक्तीपासून दूर ठेवते. पण तुम्ही पुण्यकर्माचे श्रेय घेत नाही. सर्वकाही गुरुंनीच करून घेतले, ईश्वरानेच करविले असा तुमचा मन:पूर्वक भाव असतो. आणखी असे की केलेल्या सेवेतून तुमची काही मिळवण्याची इच्छा नसते, निष्कामतेने करता. कर्तेपणाच न घेतल्याने आणि निष्कामतेमुळे त्या सत्कर्माचे फळ, म्हणजे पुण्यसुद्धा तुम्हाला जुडत नाही. म्हणजे तुमच्याकडून नवे पाप आणि पुण्यसुद्धा घडतच नाही; संचितात, संग्रहात भर पडत नाही.
पुन्हा पुन्हा जन्म का घ्यावा लागतो? आधींच्या जन्मांतील भोगण्याच्या उरलेल्या पाप-पुण्याची फळे भोगण्यासाठी पुढचे जन्म होत राहतात. आधीचे भोगायचे पाप-पुण्य ह्या, नाहीतर पुढच्या एक-दोन जन्मांत भोगून संपेल. वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या पाप-पुण्यात नवीन भर पडतच नाही. अशा प्रकारे सर्व पाप-पुण्याची फळे भोगून संपल्याने पुनर्जन्माचे कारणच उरणार नाही ! तुम्ही मुक्तच होणार !’
– पू. अनंत आठवले (१९.०९.२०२४)
टीप : लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक |