मंदिरांच्या भूमी लाटणार्‍या तहसीलदारांसह सर्व दोषींना त्वरित अटक करा ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

अमरावती येथील श्री सोमेश्वर संस्थानाची ५० कोटींची भूमी ९६० रुपयांना विकली !

श्री सोमेश्वर महादेव संस्थान

अमरावती – येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानाची ५० कोटी रुपयांची भूमी तहसीलदारांच्या बेकायदेशीर आदेशाने केवळ ९६० रुपयांना विकल्याचा अतिशय गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघ या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. या प्रकरणी तातडीने तहसीलदार आणि सर्व संबंधित दोषींची चौकशी करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –

१. श्री सोमेश्वर महादेव संस्थान, अमरावती, ता. जि. अमरावती या धार्मिक संस्थानाच्या मालकीची मौजा-पेठ अमरावती, ता. जि. अमरावती येथे शेत सर्व्हे क्र. ९४, क्षेत्रफळ ४ हेक्टर ८५ आर्. ही शेतभूमी आहे.

२. ती हडप करण्याच्या हेतूने सुमन कोठार यांनी तहसीलदार, अमरावती यांच्या समक्ष ही शेतभूमी खरेदी करून मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. या प्रकरणात तहसीलदार, अमरावती विजय सुखदेव लोखंडे यांनी कुळ कायद्याच्या प्रावधानाचे उल्लघंन करत संस्थानाचा प्राथमिक आक्षेप अर्ज निकाली न काढता या प्रकरणात कोणतेही साक्ष-पुरावे न घेता संस्थानाच्या मालकीची ५० कोटी रुपये मूल्य असलेली भूमी केवळ ९६० रुपयांमध्ये खरेदी करू देण्याचा बेकायदेशीर आदेश काढला. हा आदेश २६.९.२०२४ या दिवशी पारित करण्यात आला. आदेश पारित केल्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजेच २७.९.२०२४ या दिवशी अपील कालावधीची मुदत संपण्यापूर्वी खरेदीसुद्धा नोंदवून घेण्यात आली.

३. तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यांनी श्री सोमेश्वर संस्थानाच्या शेतभूमी प्रकरणात अनियमितता करून बेकायदेशीरपणे संस्थानाच्या शेतभूमीचे हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला आहे. यात संस्थान आणि संस्थान यांच्या भक्तगणांची घोर फसवणूक झाली आहे.

४. तहसीलदार विजय लोखंडे यांनी तहसीलदार पदाचा गैरवापर करून या प्रकरणात बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवली. कूळ कायद्यातील कायदेशीर प्रावधाने आणि शासकीय परिपत्रक यांचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे.

५. संस्थानची भूमी हडपण्यासाठी स्थानिक ‘बिल्डर लॉबी’ही सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यामुळे तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यांच्या विरोधात सेवा, शिस्त आणि नियम, तसेच इतर सक्षम कायद्याच्या अंतर्गत विभागीय चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केली आहे.

६. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य कोअर कमिटी पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल आणि महासंघाचे जिल्हा निमंत्रक श्री. कैलाश पनपालीया यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, अमरावती यांच्याकडे याविषयी तक्रार अर्ज सादर केला आहे. तरी तहसीलदार विजय लोखंडे यांसह सर्व दोषींवर कारवाई न केल्यास मंदिर महासंघाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी महासंघाने दिला आहे.