‘२८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ करण्यात आला. यज्ञाच्या कालावधीत मला आलेल्या अनुभूती मी श्री भगवतीदेवीच्या चरणी अर्पण करते.
१. २८.५.२०२४ या दिवशी यागाला आरंभ झाल्यावर मला व्याघ्रारूढ भगवती चंडीदेवीचे दर्शन झाले. त्या वेळी मला वातावरणात ६० टक्के मारक आणि ४० टक्के तारक तत्त्व जाणवले.
२. ‘कैलास पर्वतावर देवीच्या समवेत शिव असून देवी ध्यान करत आहे’, असे दृश्य दिसणे
‘देवी कैलास पर्वतावर स्थित झाली असून तिचे सूक्ष्म रूप रामनाथी आश्रमात अवतरले आहे’, असे मला जाणवले. देवीच्या समवेत भगवान शिवही होता. तो पृथ्वीकडे कृपादृष्टीने पहात होता. त्यानंतर ‘देवी कैलास पर्वतावर ध्यान करत आहे’, असे दृश्य मला दिसले. तेव्हा ‘दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः ।’, म्हणजे ‘हे दुर्गादेवी, ‘तुझे स्मरण केले असता तू सर्व प्राणीमात्रांची भीती दूर करतेस’, हा श्लोक पुरोहित म्हणत होते.
३. माझे मन यज्ञाशी आपोआप एकरूप होऊ लागले. वातावरणातील मारक तत्त्व न्यून होऊन मला शांती आणि आनंद जाणवू लागला.
४. डोळे मिटल्यावर एका तेजस्वी देवीचे दर्शन होणे आणि तिने ‘तुला माझ्या लोकात घेऊन आले आहे’, असे सांगणे : मी डोळे मिटल्यावर मला एका देवीचे दर्शन झाले. तिने हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. तिच्या हातात त्रिशूळ आणि मस्तकावर चंद्रकोर होती. देवीने ‘आलता’ (टीप) लावल्याप्रमाणे तिचे करकमल लालसर दिसत होते. तिच्या देहाचा वर्णही लाल होता. तिचे वाहन ‘वृषभ’ होते. तिच्या कंठात पांढर्या टोकेरी फुलांचा हार होता. (तो हार कदाचित् ‘जाईच्या न उमललेल्या कळ्यांचा असावा’, असे मला वाटले.) तिला तीन नेत्र होते. देवीचे रूप ज्या जागी दिसत होते, तो परिसर सुंदर हिरव्या फुलझाडांनी बहरलेला होता. देवी पुष्कळ तेजस्वी होती. मला सर्वत्र पिवळसर पांढरा प्रकाश दिसत होता. देवी मला सूक्ष्मातून म्हणाली, ‘मी तुला माझ्या लोकात घेऊन आले आहे.’
टीप – शुभ कार्यात स्त्रिया स्वतःचे हात आणि पाय यांना जो लाल रंग लावतात, त्याला ‘आलता’, असे म्हणतात.
५. दैवी सुगंध आल्यावर देवीचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवणे आणि ‘सर्वकाही देवीच्या नियंत्रणात आहे’, असे वाटणे
त्यानंतर मला कुंकवाचा आणि केवडा अन् हीना या अत्तरांचा दैवी सुगंध आला. असा सुगंध दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये येतो. तेव्हा ‘तिथे देवीचे प्रत्यक्ष अस्तित्व आहे’, असे मला जाणवले. ‘देवीच्या नियंत्रणात सर्वकाही असून सूर्यनारायणही तिच्याच नियंत्रणात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ‘देवी योगनिद्रेत आहे’, असे दृश्य दिसले.
६. निळा प्रकाशमान गोळा दिसणे आणि देवीने ‘तुझा भक्तीभाव वृद्धींगत करणार आहे’, असे सांगणे
‘एक निळ्या रंगाचा प्रकाशमान गोळा माझ्या दिशेने येत आहे’, असे मला दिसले. तेव्हा देवी मला सूक्ष्मातून म्हणाली, ‘मीच तुझा भक्तीभाव वृद्धींगत करणार आहे.’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून कृतार्थ झाल्याप्रमाणे वाटले.
७. देवीला ‘तू कोण आहेस ?’, असे विचाल्यावर देवीने एक चांदीची मूर्ती दाखवणे आणि ती पाहून ‘कन्याकुमारी’ अन् ‘मीनाक्षी’ या देवींचे स्मरण होणे
‘ती देवी कोण आहे ?’, हे मला कळले नाही. मी देवीला आर्ततेने विचारले, ‘हे माते, तू कोण आहेस ?’ तेव्हा देवीने मला सूक्ष्मातून तिची एक चांदीची मूर्ती दाखवली. त्या चांदीच्या मूर्तीमध्ये दाक्षिणात्य पद्धतीने सजावट केली होती. त्या वेळी मला ‘कन्याकुमारी’ आणि ‘मीनाक्षी’ या देवींचे स्मरण झाले.
८. देवीने सूक्ष्मातून कैलास पर्वतावरील मानससरोवर येथे नेणे
८ अ. मानससरोवराचे पाणी निर्मळ आणि दैवी दिसणे अन् त्याचा स्पर्श कोमटसर लागणे : त्यानंतर देवीने मला सूक्ष्मातून ‘कैलास पर्वतावरील मानससरोवर येथे नेले. देवी मला म्हणाली, ‘या पाण्याकडे पहा.’ मी त्या पाण्याकडे पाहिले. ते पुष्कळ निर्मळ आणि दैवी दिसत होते. त्या पाण्याचा स्पर्श मी सूक्ष्मातून अनुभवण्याचा प्रयत्न केल्यावर ते मला कोमटसर वाटले.
८ आ. त्यानंतर देवी मला म्हणाली, ‘या पाण्याप्रमाणे मन निर्मळ हवे.’ तेव्हा मी निःशब्द झाले. ‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी किती प्रयत्न करायला हवेत ?’, याची मला जाणीव झाली.
८ इ. देवीने ३ ऋषींची भेट घडवून आणणे : त्यानंतर देवीने स्वतः माझा हात धरला. तेव्हा त्या मानससरोवरावर तीन ऋषी प्रकाशझोताच्या स्वरूपात स्नानासाठी आले होते. देवीने माझी त्यांच्याशी भेट घडवून आणली.
८ ई. ‘ती देवी, म्हणजे कांचीपुरम् येथील कामाक्षीदेवी आहे’, असे जाणवणे आणि देवीने साधिकेला गायन अन् नृत्य, या दोन्ही सेवा सादर करण्यास सांगणे : त्यानंतर देवीने माझ्याकडे कृपाळू दृष्टीने पाहिले. तेव्हा ‘ती कांचीपुरम् येथील कामाक्षीदेवी आहे’, असे मला आतून जाणवले. हे दृश्य दिसत असतांना मला पुन्हा पुष्कळ सुगंध येत होता. मी डोळे उघडल्यावर सुगंध येणे थांबले. मी पुन्हा डोळे मिटून देवीला अनुभवण्याचा प्रयत्न केला. देवी माझ्या डोळ्यांसमोरच होती. मी तिला सूक्ष्मातून विचारले, ‘हे माते, तुझ्यासाठी नृत्यसेवा अर्पण करू कि गायनसेवा ?’ तेव्हा देवीने उत्तर दिले, ‘दोन्ही सेवा !’
८ उ. देवीसमोर गायन आणि नृत्य सेवा सादर करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
१. देवीने सांगितल्याप्रमाणे मी देवीच्या समोर प्रथम गायनसेवा सादर केली. तेव्हा कामाक्षीदेवीच्या शेजारी सरस्वतीमाताही आसनस्थ झाली होती. ‘मी काय गात आहे ? कोणते शब्द आहेत ?’, हे मला काहीच कळले नाही.
२. नंतर मी देवीच्या चरणी नृत्यसेवा अर्पण करू लागले. तेव्हा तिथे भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान झाले होते. त्या वेळी मला कामाक्षीदेवीच पार्वतीदेवीच्या स्वरूपात दिसली.
३. ते ठिकाण पुष्कळ सुंदर होते. एखाद्या दाक्षिणात्य मंदिरात ज्याप्रमाणे दिव्यांनी गर्भगृह सजवले जाते, त्याचप्रमाणे देवीच्या आजूबाजूला दैदीप्यमान दिवे होते. दोन्ही सेवा अर्पण झाल्यावर माता कामाक्षीने मला तिच्या हृदयाशी धरले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला. ‘मी ज्याची कल्पनाही कधी केली नव्हती’, अशी अनुभूती साक्षात् मातेनेच मला दिली. त्यानंतर मला पुढील ओळी सुचल्या.
माता कामाक्षीदेवी दर्शन देई । तिच्या दिव्य लोकात नेई ।। १ ।।
मन बाह्य जगाला विसरून जाई । लागली चरणप्राप्तीची घाई ।। २ ।।
‘हे भगवतीमाते, ‘तुझ्याच कृपेमुळे मला ‘नवचंडी’ यज्ञाच्या वेळी तुझे दिव्य स्वरूप अनुभवता आले’, याबद्दल मी श्री गुरु आणि श्री भगवती कामाक्षीदेवी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (४.६.२०२४)
|