१. वेदांमध्ये केलेले भूदेवीचे वर्णन !
‘वेदांमध्ये भूदेवीचे वर्णन कसे केले आहे ?’, हे आपण जाणून घेऊया. ऋग्वेदातील श्रीसूक्तात पुढील महत्त्वपूर्ण मंत्र आहे.
विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियाम्।
विष्णोः प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्।। – श्रीसूक्त, फलश्रुती
अर्थ : श्रीविष्णूची पत्नी, क्षमास्वरूपिणी (भूदेवी), माधवाची (श्रीविष्णूची) प्रिय, श्रीविष्णूची प्रिय सखी आणि जिने अच्युताचे (श्रीविष्णूचे) मन आकर्षित करून घेतले आहे, अशा देवीला मी नमस्कार करतो.
२. भूदेवीचे माहात्म्य
श्रीमन्नारायणाप्रमाणे भूदेवीही ब्रह्मांडव्यापी आणि अनंतस्वरूप आहे. ब्रह्मांडात डोळ्यांना दिसणारे स्थुलातील सर्वकाही भूदेवीच्या अंशाने व्यापलेले आहे. भूदेवी म्हणजे केवळ पृथ्वी किंवा भूमी एवढेच नाही. स्थुलातून डोळ्यांना दिसणारी भूमी, म्हणजे भूदेवीचा एक अंशमात्र आहे. श्रीविष्णूची चराचर सृष्टी चालण्यासाठी पंचमहाभूतांमुळे निर्माण झालेले हे ब्रह्मांड भूदेवीमुळे कार्यरत असते.
३. युगांनुसार श्रीविष्णूने पृथ्वीवर अवतार घेतल्यावर भूदेवीही पृथ्वीवर अवतरणे
३ अ. त्रेतायुग : या युगात ब्रह्मस्वरूपिणी भूदेवी पृथ्वीवर आली. तेव्हा तिला ‘सीता’, असे म्हटले गेले. त्या रूपात ती श्रीरामाची शक्ती म्हणून कार्यरत होती.
३ आ. द्वापरयुग : या युगात भूदेवी ‘सत्यभामा’ या रूपात प्रगट झाली.
३ इ. कलियुग : या युगात ३ सहस्र वर्षांपूर्वी भूदेवी तिरुपती येथे ‘पद्मावतीदेवी’च्या रूपात प्रगट झाली.
४. श्रीविष्णूच्या ‘शक्ती’ची कार्यानुसार प्रगट रूपे, म्हणजे भूदेवी आणि श्रीदेवी !
दोन डोळे असल्यासच स्थिर दृष्टी प्राप्त होते. दिवस आणि रात्र मिळून एक दिवस होतो. पक्ष्याला आकाशात भरारी मारण्यासाठी दोन पंखांची आवश्यकता असते. अमावास्येपर्यंतचे १५ दिवस आणि त्यानंतर पौर्णिमेपर्यंतचे १५ दिवस मिळून एक मास होतो. त्यामुळे या दोन्ही तिथींना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात त्याच्या इच्छेने त्याच्या दोन शक्ती, म्हणजे ‘भूदेवी’ आणि ‘श्रीदेवी’ प्रगट होतात. कार्यानुरूप त्या वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी त्या एकच आहेत आणि दोन्ही सारख्याच महत्त्वाच्या आहेत. आकाशात सूर्य असतोच. तो ना उगवतो, ना मावळतो; मात्र मनुष्य पृथ्वीवर असल्याने सूर्याेदय आणि सूर्यास्त अनुभवत असतो. त्याचप्रमाणे श्रीविष्णूच्या ‘शक्ती’ची कार्यानुसार प्रगट रूपे, म्हणजे ‘भूदेवी’ आणि ‘श्रीदेवी’ होत !
५. सध्याच्या कलियुगातील भूदेवी आणि श्रीदेवी, म्हणजे अनुक्रमे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
सध्या भूदेवी पृथ्वीवर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या रूपात आणि श्रीदेवी कांचीपुरम् (तमिळनाडू) येथे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रूपात कार्यरत आहेत’, असे ऋषिवाणीतून साधकांच्या समोर आले आहे. श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्यात या दोघींचेही महत्त्व सारखेच आहे.
६. भूदेवीप्रमाणे साधकांच्या समस्या विष्णुरूपी परात्पर गुरुदेवांकडे मांडणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ !
जन्म-मृत्यूच्या चक्रांत अडकलेले जीव बद्ध, म्हणजे अज्ञानी असतात. श्रीविष्णूचे चरण म्हणजे मोक्ष आहे. जन्म-मृत्यूच्या चक्रांत अडकलेल्या जिवांसाठी श्रीविष्णूच्या चरणांपर्यंत जाण्याची शिडी म्हणजे भूदेवी होय. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात सर्व साधकांनी ही अनुभूती घेतलेली आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकांना श्रीविष्णूच्या चरणांपर्यंत पोचण्याचा मार्ग त्यांच्या प्रकृतीनुसार सांगत असतात. ज्याप्रमाणे भूदेवी आपल्या मुलांची प्रार्थना वेळ आणि काळ पाहून योग्य शब्दांत श्रीविष्णूकडे मांडते, त्याचप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकांचे प्रश्न अन् समस्या विष्णुरूपी परात्पर गुरुदेवांकडे मांडतात.
‘हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपातील भूदेवी, ‘तूच आम्हाला विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणांपाशी पोचण्याचा मार्ग दाखव आणि आम्हाला त्यांच्या चरणांपर्यंत घेऊन जा’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे), कांचीपुरम्, तमिळनाडू. (२३.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |