Air Chief Marshal Attack on India : भारतावर इस्रायलप्रमाणे क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण झाल्‍यास आपण ती सर्व रोखू शकणार नाही !  – एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह

वायूदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी दिली माहिती

एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह

नवी देहली – इस्रायलप्रमाणे भारतावर क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण झाले, तर भारत सर्व क्षेपणास्‍त्रे रोखू शकणार नाही; कारण आपले क्षेत्र इस्रायलपेक्षा अधिक आहे, अशी माहिती भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी दिली. ‘रशियाकडून खरेदी करण्‍यात येत असलेल्‍या ‘एस् ४०० हवाई संरक्षण प्रणाली’मधील २ प्रणाली रशिया लवकरच देईल, अशी आशा आहे’, असेही त्‍यांनी सांगितले. ९२ व्‍या वायूसेना दिनाच्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारताने रशियाकडून ही प्रणाली विकत घेतली आहे. याद्वारे भारतावर कुणी क्षेपणास्‍त्रे डागली, तर त्‍यांना हवेतच नष्‍ट करता येऊ शकते.

चीन समवेत तणाव कायम !

एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह म्‍हणाले की, पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्‍या प्रत्‍यक्ष नियंत्रणरेषेवर कोणताही पालट झालेला नाही; मात्र दोन्‍ही देशांमध्‍ये तणाव कायम आहे. चीन त्‍याच्‍या सीमेवरील पायाभूत सुविधांमध्‍ये झपाट्याने वाढ करत आहे. शत्रूच्‍या सिद्धतेशी जुळवून घेण्‍याचे आव्‍हान आमच्‍यासमोर आहे आणि आम्‍ही आमच्‍या पायाभूत सुविधांमध्‍ये इतर मार्गांनी सुधारणा करत आहोत. पूर्व लडाखमध्‍ये अधिक प्रगत लँडिंग ग्राऊंड आणि नवीन विमानतळ बांधले जात आहेत.

आम्‍ही कुठे आणि कुणाला मारू शकतो, हे मी सांगणार नाही !

वायूदलप्रमुख अमरप्रीत सिंह यांना विचारण्‍यात आले, ‘इस्रायल लेबनॉनमध्‍ये हिजबुल्लाच्‍या प्रमुखाला मारून टाकू शकतो, तर भारत असे पाकमधील आतंकवाद्यांच्‍या विरोधात का करत नाही ?’ त्‍यावर त्‍यांनी उत्तर दिले, ‘आम्‍ही हे बालाकोटमध्‍ये केले आहे. आम्‍ही कुठे आणि कुणाला मारू शकतो, हे मी सांगणार नाही.’

वायूदलाला लढाऊ विमानांची आवश्‍यकता !

एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंह म्‍हणाले की, लढाऊ विमानांची शक्‍ती टिकवून ठेवणे हे भारतीय वायूदलासमोर मोठे आव्‍हान आहे. भारतीय वायूदलाला सध्‍या लढाऊ विमानांची कमतरता भासत आहे. भारतीय वायूदलाकडे सध्‍या ३१ स्‍क्‍वॉड्रन्‍स (विमानांचा गट. एका गटात १२ ते १४ विमाने असतात.) आहेत आणि पुढील १५ वर्षांत त्‍यांतील बहुतांश स्‍क्‍वॉड्रन्‍स टप्‍प्‍याटप्‍प्‍याने काढून टाकले जातील. भारताला ४२ स्‍क्‍वॉड्रनची आवश्‍यकता आहे. ‘मिग-२१ बायसन’ आणि ‘मिग-२९’ स्‍क्‍वॉड्रन्‍स अनुक्रमे वर्ष २०२५ आणि वर्ष २०३५ पर्यंत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने बाहेर काढण्‍यात येतील. वर्ष २०१९ मध्‍ये पाकिस्‍तानविरुद्ध बालाकोट येथे आक्रमण करणारी फ्रेंच लढाऊ विमाने ‘मिराज-२०००’ही वर्ष २०३५ पर्यंत निवृत्त होणार आहेत. आम्‍ही आमच्‍या गरजा अगदी स्‍पष्‍ट केल्‍या आहेत आणि आम्‍ही सरकारकडून प्रतिसादाची वाट पहात आहोत. सर्वांत महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे ही विमाने भारतातच बनली पाहिजेत.