ऑनलाईन फसवणुकीविषयी शेतकर्‍याकडून नंदुरबार सायबर सेलकडे तक्रार !

प्रतिकात्मक चित्र

नंदुरबार – तळोदा येथील शेतकरी सुधाकर पिंपरे यांना अनोळखी व्यक्तीने संपर्क करून त्यांच्याकडून पिंपरे यांच्या खात्यात चुकून ३५ सहस्र रुपये गेल्याचे सांगितले. ‘रुग्णालयीन कामासाठी ते तात्काळ परत हवे आहेत’, असेही सांगितले. पुरावा म्हणून पैसे न्यून झाल्याच्या लघुसंदेशाचे छायाचित्र त्या व्यक्तीने पिंपरे यांना पाठवले. अनोळखी व्यक्ती रुग्णालयीन कामाचे कारण देत असल्याने पिंपरे यांनी त्या व्यक्तीला २२ सहस्र ५०० रुपये पाठवले. काही वेळानंतर आपल्या खात्यात ३५ सहस्र रुपये जमाच झाले नसल्याचे पिंपरे यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी नंदुरबार सायबर सेलकडे याची तक्रार केली. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकार पुष्कळ वाढल्याने नागरिकांनी सतर्क रहाण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. (पोलीस संबंधित आरोपींवर ठोस कारवाई कधी करणार ? तेही त्यांनी सांगावे ! – संपादक)