दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार !; सेवानिवृत्त पोलिसाला वेतन चालूच !

जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार !

जळगाव – गायीच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २८ रुपये असून राज्यशासनाने नुकतेच प्रतिलिटर ७ रुपये अनुदान घोषित केले आहे; मात्र ‘जिल्हा दूध संघा’ने ३० रुपये प्रतिलिटर खरेदीदर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. संघाकडे दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी ३७ रुपये प्रतिलिटर असा भाव मिळणार आहे.


सेवानिवृत्त पोलिसाला वेतन चालूच !

जळगाव – जिल्हापोलीस दलातील शेख हसन शेख जैनोद्दीन हा कर्मचारी त्याच्या वयानुसार जुलै २०२४ मध्ये सेवानिवृत्त होणे अपेक्षित होते; पण संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांनी त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकाकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरही त्याला पूर्ण वेतन मिळत होते. आता २ महिन्यांचे अधिकचे वेतन त्याला सरकारला परत करावे लागणार आहे.

संपादकीय भूमिका : पोलीसदलाचा भोंगळ कारभार !


भुसावळ येथे २३ सहस्र रुपयांची लूट !

भुसावळ – तालुक्यातील किन्ही येथे असलेल्या एम्.आय.डी.सी.मधील एका ठिकाणचे कुलूप तोडून चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी, बांधकामाचे साहित्य, शिलाई यंत्र आणि पत्र्याचा कुलर असे २३ सहस्र रुपयांचे साहित्य लुटले. याविषयी मालक श्री. दीपक अगरवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सिडकोकडून हस्तांतरण शुल्क रहित

नवी मुंबई – सिडकोने घरांचे हस्तांतरण शुल्क घेण्याचा निर्णय रहित केला आहे. असे होण्यासाठी चालू केलेल्या आंदोलनाचे हे यश आहे, अशी माहिती ‘सिटीजन्स फाउंडेशन’चे अध्यक्ष सतीश निकम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. सिडकोने याविषयीचा प्रस्ताव संमत करून मंत्रीमंडळाच्या संमतीसाठी पाठवला आहे. लवकरच मंत्रीमंडळाची संमती होऊन या विषयाचा अध्यादेश निघेल, असा विश्वास सहकारभारतीचे नवी मुंबई अध्यक्ष प्रमोद जोशी यांनी व्यक्त केला.

संपादकीय भूमिका : आंदोलनाला मिळाले यश


नागपूर येथे सामूहिक आत्महत्या !

नागपूर – मवार गावात ६८ वर्षीय विजय पाचोरी, त्यांची पत्नी माला आणि त्यांची मुले गणेश आणि दीपक यांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. पोलिसांना सापडलेल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांच्या स्वाक्षर्‍या होत्या. बँकेत कामाला असलेल्या गणेश याला बँकेतील फसवणुकीच्या प्रकरणात काही काळ अटक झाली होती. आत्महत्येपूर्वी या सर्वांचे हात बांधलेले आढळले.


मुलींची छेड काढणारा तरुण अटकेत !

भाईंदर – येथे अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणार्‍या धीरज गोरे (वय २५ वर्षे) याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी मुलीच्या आईने घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता.