Shankaracharya Nischalananda On Conversions : धर्मांतर करणार्‍यांना राजकारण्यांकडून संरक्षण मिळते ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

धर्मांतर करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

बिलासपूर (छत्तीसगड) – धर्मांतर करणार्‍यांना राजकारण्यांकडून संरक्षण मिळते. तालिबानच्या राजवटीत ४ ख्रिस्ती लोक मुसलमानांचे धर्मांतर करण्यासाठी गेले होते; मात्र त्यांना तालिबानी मुसलमानांनी फाशी दिली होती. ज्याप्रमाणे तालिबान आणि जगातील इतर देश गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देत आहेत, त्याचप्रमाणे अशा लोकांना एकतर फाशी द्यावी किंवा कारागृहात टाकावे, असे विधान पुरीतील पुर्वाम्नाय पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले. शंकराचार्य सध्या बिलासपूरच्या ३ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत.

शंकराचार्यांनी मांडलेली सूत्रे

१. जोपर्यंत संपूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसाद प्रकरणात काहीही बोलणे योग्य नाही.

२. आम्हा शंकराचार्यांना भाजपच्या सत्ताकाळात काँग्रेसचे लोक ‘भाजपवाले’, तर काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपचे लोक ‘काँग्रेसवाले’ म्हणतात. शंकराचार्य हे कुणाचे समर्थक नाहीत. जो कुणी या पदाची अपकीर्ती करेल, ती स्वतःचीच अपकीर्त  असेल.

३. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद यांच्याविषयी ते म्हणाले की, माझे कुणाशीही वैर नाही आणि मी कुणाचा शत्रूही नाही. ज्यांनी विरोध केला, ते विभागले गेले.

लोकांनी अधिक महत्त्वाकांक्षी नसावे !

शंकराचार्य पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना दाढी आहे. ते स्वत:ला ‘संत’ समजू शकतात; पण वास्तव हे आहे की, ते स्वत:ला कुणापेक्षा कमी समजत नाहीत. मोदी यांची ‘गॅरंटी’ आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंधप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर चालली आहे.

महागाई वाढण्यामागे ‘दलाली’ हेच मुख्य कारण !

पूर्वी २५ रुपये किलो दराने बनवलेले साहित्य २७ रुपयांना सर्वसामान्यांपर्यंत पोचायचे; मात्र आता २५ रुपये किमतीचे साहित्य बाजारात २५० रुपयांना मिळत आहे. याचे मूळ कारण ‘दलाली’, हे आहे. बाजारात दलालांची संख्या वाढली आहे.