२८.९.२०२४ या दिवशी सोलापूर येथील काही साधकांना जाणवलेली सूत्रे पाहिली. आज सोलापूरसह बीड आणि सातारा येथील साधकांना जाणवलेली सूत्रे पाहूया.
११. श्रीमती रूपावती न्यामणे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६९ वर्षे), कुमठा नाका, सोलापूर.
अ. ‘रथारूढ गुरुमाऊली दिसल्यानंतर माझी भावजागृती झाली. ‘तो रथ आणि साधक अधांतरी असून कुठल्यातरी दिव्य लोकात हा सोहळा चालू आहे’, असे मला जाणवले.
आ. तीनही गुरु अत्यंत प्रकाशमान दिसत होते.
इ. मला सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या भोवती पुष्कळ प्रकाश दिसला, तसेच त्यांचे रूप अत्यंत तेजःपुंज आणि ज्योतीच्या आकारात दिसले.
ई. सर्व संताच्या भोवती प्रकाशाचे वलय दिसत होते.’
१२. सौ. शोभा चौधरी, अंबाजोगाई, जिल्हा बीड.
अ. ‘ब्रह्मोत्सवासाठी आमचे वाहन बीडहून गोवा येथे जात असतांना वाटेत लागणार्या गावातील स्थानदेवता त्या वाहनातून गोवा येथे येत आहेत’, असे मला वाटले, उदा. अंबाजोगाई येथून श्री योगेश्वरीमाता, तुळजापूर येथून श्री भवानीमाता इत्यादी. ‘वाहनाभोवती भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरत आहे आणि श्री मारुति भगवा ध्वज घेऊन वाहनावर विराजमान झाला आहे’, असे मला जाणवले.
आ. प्रत्यक्ष सोहळा चालू असतांना ‘गुरुदेव विष्णूचे अवतार आहेत’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे’, असे श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी सांगितले. त्या वेळी माझ्याजवळ बसलेल्या सौ. पुष्पा टाकसाळे यांचे लक्ष आकाशाकडे गेले. त्यांना ढगामध्ये भगवान विष्णूचे रूप दिसू लागले. त्यांनी ते मला दाखवले. मलाही ते दिसले आणि माझी भावजागृती झाली.’
१३. श्री. प्रदीप जाधव, फलटण, जिल्हा सातारा.
अ. ‘सोहळ्याच्या वेळी रथारूढ झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तेजस्वी देहकांती पाहून मला सत्यनारायणाच्या कथेतील नारदाने श्रीविष्णूचे केलेले वर्णन आठवले.
आ. हवामान दमट होते आणि उकाडाही वाढला होता. असे असूनही जेव्हा तीन गुरु रथातून आले, तेव्हा त्यांच्या दर्शनाने मला दमट आणि उष्ण वातावरणाचा पूर्ण विसर पडला.
इ. ‘ब्रह्मोत्सवाचे सर्व नियोजन देवतांनी केले आहे’, असा विचार माझ्या मनात आला. कार्यक्रमस्थळाच्या मैदानावरील माती सोनेरी दिसत होती आणि ‘मातीला स्पर्श करावा’, असे मला वाटत होते.
ई. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली साधकांची छायाचित्रे मी पूर्वी पाहिली होती. त्या साधकांना व्यासपिठावर प्रत्यक्ष पाहून माझी भावजागृती होत होती.’
(सूत्र सूत्रांचा मास आणि वर्ष : जून २०२३) (समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |