पुणे – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा ताबा मिळावा, असा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र १६० गुंतवणूकदार अन् ठेवीदार यांनी मुंबई येथील विशेष न्यायाधीश एस्.सी. डागा यांच्या न्यायालयात केला आहे. डी.एस्.के. यांनी ठेवीदारांच्या पैशातून मालमत्ता विकत घेतल्या, तसेच नातेवाईकांच्या नावाने अल्प दरात भूमी खरेदी केल्या. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळवण्यासाठी डी.एस्.के. यांच्या विविध भागीदारी आस्थापनांच्या नावे असलेल्या मालमत्तांची मालकी ठेवीदारांना द्यावी. या मालमत्तांची ‘रेड हाऊस फाउंडेशन’च्या माध्यमातून विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, असे अर्जात नमूद केले आहे. ठेवीदारांचे अधिवक्ता चंद्रकांत बिडकर यांनी हे अर्ज प्रविष्ट केले आहेत. डी.एस्.के. यांच्या भागीदारी संस्थांच्या नावे असलेल्या आणि कोणताही दावा चालू नसलेल्या मालमत्ता ठेवीदारांना मिळाव्यात, असे अर्ज ठेवीदारांनी केले आहेत. ठेवीदारांना त्या मालमत्तांचा मालकी हक्क मिळाल्यावर त्यांची ‘रेड हाऊस फाउंडेशन’च्या माध्यमातून विक्री करून त्यांचे पैसे परत केले जातील, असे ‘रेड हाऊस फाउंडेशन’चे अध्यक्ष शंतनू कुकडे यांनी सांगितले.