सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

२८.९.२०२४ या दिवशी सोलापूर येथील काही साधकांना जाणवलेली सूत्रे पाहिली. आज अन्य काही साधकांना जाणवलेली सूत्रे पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३. कु. शिवलीला गुब्याड, सोलापूर

अ. ‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला येण्याचा निरोप मिळाल्यावर मलापुष्कळ आनंद होऊन माझी भावजागृती झाली. ‘माझी काहीच साधना होत नसतांना देव मला संधी देत आहे’, असे मला वाटले.

आ. मी नोकरी करत असलेल्या आस्थापनात तातडीची कामे चालू होती. त्यामुळे मला सुटी मिळणे शक्य नव्हते. आम्ही रात्रंदिवस काम करत होतो, तरीही मी गोव्याला जाण्याचे आरक्षण आणि अन्य सिद्धता केली. १०.५.२०२३ या दिवशी रात्री ८.३० वाजता मला सोहळ्याला जाण्यासाठी नियोजितस्थळी पोचण्याचा निरोप मिळाला. तेव्हा मी नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करत होते. त्या दिवशी दुपारी ४.३० वाजता मला निरोप मिळाला, ‘मी सुटी घेऊ शकते.’ ही अनुभूती दिल्याबद्दल माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

इ. सोहळ्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर माझ्या मनाला एक प्रकारचा हलकेपणा जाणवत होता. ‘माझ्या मनात आनंदाच्या लहरी आहेत’, असे मला जाणवले. ‘हा सोहळा वेगळ्याच लोकात झाला आहे’, असे मला वाटत होते. माझ्या मनात ‘कृतज्ञता’, हा शब्द येत होता.’

४. श्रीमती राणी पलंगे, करमाळा, सोलापूर. 

अ. ‘गुरुदेवांच्या समवेत त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पहाताच ‘जणू विराट रूपात श्रीमन्नारायणच दर्शन देत आहे’, असे मला वाटले.

आ. गुरुदेवांचे श्री चरण पाहून मी कृतकृत्य झाले. माझ्या जन्माचे सार्थक झाले. ‘याची देही, याची डोळां’ साक्षात् परमेश्वराचे दर्शन होणे’, माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ही गुरुदेवांचीच कृपा आहे. त्या वेळी माझ्याकडे शब्द नव्हते, तर डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञतेचा भाव होता.

काय वर्णावा श्री गुरूंचा महिमा ।
किती साठवावी नेत्रांमध्ये अशी चैतन्यप्रतिमा ।

राम, श्याम, विष्णु, नारायण, देऊ कशाची उपमा ।
वाटले जणू आलो आम्ही श्रीहरीच्या वैकुंठधामा ।।’

५. सौ. सविता देशमुख, सांगोला, जिल्हा सोलापूर.

अ. ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी आम्ही फोंडा (गोवा) येथे प्रवेश केल्यावर मला गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवू लागले. माझ्याकडून गुरूंना आळवण्याचा प्रयत्न होऊ लागला.

आ. मला घर आणि अन्य गोष्टी यांचा विसर पडला होता.’

६. सौ. सुजाता पोरे, माळशिरस, जिल्हा सोलापूर.

अ. ‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाण्याचा निरोप मिळाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मी गोव्याला जाण्याचे ठरवले; पण घरातून विरोध होता. मला गुरुदेवांना भेटण्याची ओढ लागली होती. गोव्याला जाण्याच्या आदल्या दिवशी मी यजमानांना विचारल्यानंतर त्यांनी मला जाण्याची अनुमती दिली. त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’

७. श्री. राजेंद्र खंडू हूंचे, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.

अ. ‘रथारूढ झालेल्या तीन गुरूंना (टीप) पाहून मला जाणवले, ‘श्रीकृष्ण, श्री महालक्ष्मी आणि श्री सरस्वती सोनेरी रथातून अवतरत आहेत. ते आम्हाला सांगत आहेत, ‘आम्ही सर्व जण सूक्ष्म रूपात तुमच्या अवतीभोवती आहोत. काळजी करू नका.’ ते पृथ्वीतलावर उतरून आम्हा सर्वांना आशीर्वाद देत आहेत. आमच्या भोवती संरक्षककवच निर्माण करत आहेत.’

टीप – तीन गुरु : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

८. सौ. शुभांगी जाधव, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.

अ. ‘रथावर आरूढ झालेले गुरुदेव सर्व साधकांना हात जोडून नमस्कार करत होते. त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर साधकांविषयीची प्रीती दिसत होती. ‘मी तुमच्यासाठीच आहे. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही’, अशी शाश्वती ते देत आहेत’, असे मला जाणवले.’

९. सौ. माधुरी डिंगरे (वय ७२ वर्षे), कुमठा नाका, सोलापूर.

अ. ‘रथावर पुष्पवृष्टी होत असतांना मला आकाशात ढगांमध्ये वेगवेगळ्या देवतांचे, उदा. राम, लक्ष्मण, सीता, मारुति इत्यादींचे आकार दिसत होते, तसेच एकदा मोराचा आकारही दिसला.’

१०. सौ. दुर्गा कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७० वर्षे), कुमठा नाका, सोलापूर.

अ. ‘ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला जाण्याविषयी कळण्याच्या आधी ८ दिवस मला स्वप्नात ‘सगळीकडे भगवान श्रीकृष्ण दिसत आहे. मी ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप करत आहे. मी कृष्णमय झाले आहे’, असे दृश्य दिसत होते.

आ. ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला जायचे कळल्यावर माझा भाव जागृत झाला. ‘गुरुदेवांनीच ब्रह्मोत्सवाला जाण्यातील सर्व अडचणी दूर करून प्रत्यक्ष दर्शनरूपी प्रसाद दिला’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा मास आणि वर्ष : जून २०२३)                 (क्रमशः)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक