चित्रपट अभिनेते अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांची कन्या आराध्या ही तिच्या आईच्या नेहमी समवेत असल्याच्या ‘रील्स’ (छोटी ध्वनीचित्रफीत) प्रसिद्ध होत असतात. आराध्या ही कोणताही पुरस्कार सोहळा असो किंवा, विदेश दौरा असो, नेहमी तिच्या आईसमवेत असते. नुकताच दुबईमध्ये दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (एस्.आय.एम्.ए.) सोहळा पार पडला. त्यातील आराध्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाला आहे, तो पाहून सर्व जण आराध्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओत अभिनेता शिवा राजकुमार आणि चियान विक्रम यांची भेट घेण्यासाठी ऐश्वर्या या आराध्याला घेऊन गेल्या. त्या दोघांनी हातात हात घेण्यासाठी (शेकहँडसाठी) हात पुढे केले असता, आराध्याने प्रथम त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. शिवा यांनीही आराध्याला आशीर्वाद दिले. आराध्याची ही कृती पत्रकारांच्या कॅमेर्यातून सुटली नाही. यापूर्वीही एकदा विमानतळावरच ऐश्वर्या राय यांचे आई-वडील आल्यावर तिने त्यांना विमानतळावर वाकून नमस्कार केला होता. नुकत्याच मे २०२४ मध्ये फ्रान्स येथे पार पडलेल्या प्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन सहभागी झाल्या होत्या. या वेळी आईच्या हाताला दुखापत झाल्याने आराध्या आईला सहकार्य करत असल्याचेही व्हिडिओ प्रसारित झाले होते. १३ वर्षांच्या आराध्याकडून घडणार्या या कृती पत्रकार टिपत आहेत. ३ वर्षांची असतांना ऐश्वर्या यांनी तिला मंत्र आणि श्री गणेशाची आरती शिकवल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. बच्चन कुटुंब वलयांकित असल्यामुळे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होतात. यातील त्यांचे प्रसिद्धीचे, पैशांचे किंवा अन्य काही हेतू बाजूला ठेवले, तरी यातून संदेश मात्र योग्य गेला, हे निश्चित !
आजकाल विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजी-आजोबा घरात नसतात किंवा घरात असले, तरी त्यांच्या म्हणण्याला तितकासा मान दिला जातोच, असे नाही. घरातील कौटुंबिक, सांस्कृतिक, धार्मिक वातावरण यांचाही परिणाम मुलांवर होत असतो. त्यातून मुलांवर संस्कार होत असतात. मुलांच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख उत्तरदायित्व पालकांवर आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींवरही असते. गर्भधारणेपासून विवाहापर्यंतच्या काळात पुत्र किंवा कन्या यांच्याकडून सम्यक (सात्त्विक) कृती व्हावी; म्हणून आई, वडील आणि आचार्य वैदिक पद्धतीने जे विधी करवून घेतात, त्यांना ‘धर्मसंस्कार’ असे म्हणतात. मोठ्यांचा आदर राखणे, इतरांना साहाय्य करणे, त्याग, संयम, खरे बोलणे, नैतिकता, उपासना करणे आदी चांगली व्यक्ती आणि नागरिक बनण्याचे संस्कार नवीन पिढीवर होणे आवश्यक असते. यासाठी पालकांनी आवर्जून प्रयत्नरत रहायला हवे.
– श्री. नीलेश पाटील, जळगाव