१. ‘साधना’विषयक शिबिराच्या माध्यमातून सनातन संस्थेशी जोडले जाऊन साधनेला आरंभ होणे
‘२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात झालेल्या साधना शिबिरासाठी मी आणि माझा लहान भाऊ (श्री. वेदांत अरुण सोनार (वय २१ वर्षे)) गेलो होतो. या शिबिराच्या माध्यमातून आम्ही सनातन संस्थेशी जोडले गेलो. येथूनच आमच्या साधनेला आरंभ झाला.
२. घरी गेल्यावर साधना शिबिरात झालेल्या विषयांविषयी बोलतांना सत्संग अनुभवणे
साधना शिबिर संपल्यावर आम्ही दोघे घरी गेलो; मात्र घरी गेल्यावरही आम्ही दोघे कार्यशाळेत झालेल्या प्रत्येक विषयाविषयी बोलायचो. तेव्हा तो एक प्रकारे आमचा सत्संगच होत होता.
या शिबिराच्या वेळी मी गुरुदेवांना प्रार्थना केली होती, ‘तुम्ही आम्हाला हा जो मार्ग दाखवला आहे, त्या मार्गावर आम्हाला सातत्याने आणि तुम्हाला अपेक्षित असे चालता येऊ दे. तुम्हीच आमच्याकडून तशी साधना करून घ्या.’ या प्रार्थनेची अनुभूती मला ५ मासांनंतर मी आणखी एका शिबिराच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर आली.
३. गुरुकृपेने व्यष्टी आणि समष्टी सेवेचे प्रयत्न होणे
त्यानंतर माझ्याकडून गुरुकृपेने व्यष्टी साधनेचे प्रयत्न होऊ लागले, तसेच ‘जळगाव सेवाकेंद्रात जाऊन सेवा करणे, उपक्रमात सहभागी होणे’, असे समष्टी सेवेचेही प्रयत्न होऊ लागले.
४. शिबिराच्या सेवेसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर अनुभवलेली गुरुकृपा !
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानंतर झालेल्या शिबिराच्या सेवेसाठी आम्हाला (मला आणि माझ्या लहान भावाला) रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली. ५ मासांनी आम्ही पुन्हा रामनाथी आश्रमात सेवेसाठी आलो. तेव्हा मी भरभरून गुरुकृपा अनुभवली.
४ अ. रामनाथी आश्रमातील साधकांमध्ये असलेल्या प्रेमभावामुळे त्यांच्यामध्ये सहजतेने मिसळता येणे : रामनाथी आश्रमात नवीन असूनही ‘मी बाहेरून आलो आहे’, असे मला एकदाही वाटले नाही. सर्व साधकांचे प्रेम आणि आपुलकी पाहून ‘श्री गुरूंच्या दारी सगळे आपलेच आहेत’ किंवा ‘सर्व साधक श्री गुरूंचेच रूप आहेत’, असेच मला वाटायचे. त्यामुळे मी सहजतेने सर्वांमध्ये मिसळलो.
४ आ. नवीन प्रकारच्या सेवा शिकून करणे आणि गुरुकृपेने थकवा न येता आनंद मिळणे : आश्रमसेवेच्या अंतर्गत मला आणि माझ्या लहान भावाला ‘भांडी स्वच्छता, प्रसाधनगृह स्वच्छता’, अशा वेगवेगळ्या सेवा शिकता आणि करता आल्या. सेवा करतांना मला कधीही थकवा किंवा त्रास जाणवला नाही. ‘आपण इतक्या क्षमतेने सेवा कशी करू शकतो ?’, याचे आम्हा दोघांनाही आश्चर्य वाटायचे. ‘खरे तर ही श्री गुरूंचीच शक्ती आणि कृपा आहे’, असेच म्हणावे लागेल. एवढ्या सेवा करूनही मला हलकेपणा आणि आनंद जाणवायचा.
४ इ. कुलदेवतेच्या नामजपामुळे नकारात्मकता जाऊन आनंद अनुभवता येणे : काही वेळेस आश्रमात असतांना माझे डोके आणि डोळे जड व्हायचे. त्यामुळे माझ्या मनात नकारात्मक आणि चिंतेचे विचार यायचे. सेवा करतांना मी कुलदेवतेचा नामजप करायचो. तो नामजप करतांना आपोआप त्या नकारात्मक विचारांच्या विरुद्ध योग्य दृष्टीकोन मिळून मला आनंद अनुभवता येत असे.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेली अनुभूती
५ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले मनात विराजमान आहेत’, असा भाव निर्माण होणे आणि मनात आलेल्या कुठल्याही शंकेचे लगेच निरसन होणे : गुरुदेवांनी शिकवलेल्या अष्टांग साधनेपैकी ‘भावजागृती’ या अंगाचे मला पुष्कळ साहाय्य होत होते. कधी कधी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मला काळजी वाटून मन उदास व्हायचे; पण ‘भाव तिथे देव’ या गुरुदेवांच्या शिकवणुकीमुळे मी त्यांना माझ्या मनात अनुभवू लागलो. ‘गुरुदेव माझ्या मनात विराजमान आहेत’, असे मला वाटत असल्यामुळे मी माझ्या मनाची स्थिती त्यांना सांगायचो. तेव्हा ‘ते माझ्या मनात एकही शंका किंवा प्रश्न टिकू द्यायचे नाहीत. ‘एखादा साधक, दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा मनात आलेला योग्य विचार’, या माध्यमांतून ते माझ्या शंका निरसन करून मला शिकवायचे’, असे मी अनुभवले.
५ आ. सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मनावरील काळजीचे मळभ दूर करून आनंदी करणे : एकदा काळजीच्या विचारांमुळे मी पुष्कळ उदास झालो होतो. त्यामुळे माझा आनंद हरवला होता. मी आश्रमातील सभागृहात लावलेल्या गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर बसून त्यांना माझी व्यथा सांगितली. तेव्हा ‘मी त्यांच्याशी समक्षच बोलत आहे’, असे मला वाटले. त्यांना आत्मनिवेदन करतांना मला रडू येत होते. मी त्यांच्याकडे पाहिले, तेव्हा सूक्ष्मातून ते हसत होते; म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘गुरुदेवा, मला किती वाईट वाटत आहे. माझ्या मनाची स्थिती चांगली नाही आणि तुम्ही हसत आहात.’ तेव्हा त्या हसर्या छायाचित्रामधून गुरुदेव मला म्हणाले, ‘अरे, तू तुझ्या सद्यस्थितीकडे बघून रडतोस; पण पुढे तुझे चांगले होणार आहे’, हे मला ठाऊक असल्याने मी हसत आहे.’ हे ऐकून मला कृतज्ञता वाटली आणि मी पुन्हा पूर्ववत् आनंदावस्थेत आलो. या अनुभूतीमुळे माझी श्री गुरूंवरील श्रद्धा आणखी वाढली.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरुदेव, माझा आत्मा मला सांगतो, ‘तुम्ही माझ्या मनात राहून प्रत्येक क्षणी मला सांभाळत आहात.’ गुरुदेवा, तुम्ही माझ्यावर गुरुकृपेचा भरभरून वर्षाव करत आहात; पण मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासही अल्प पडत आहे. तुम्ही माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजप करून घेऊन मला तुमच्या चरणांपर्यंत, म्हणजेच ईश्वरप्राप्तीकडे घेऊन जात आहात’, यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञता ! तुम्हीच मला तुमच्या चरणांचा सेवक बनवून तुम्हाला अपेक्षित अशी साधना आणि सेवा माझ्याकडून करून घ्या’, अशी प्रार्थना !’
– श्री. संकेत अरुण सोनार, जळगाव (१.८.२०२३)
|