|
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील तुमकुर जिल्ह्यात असलेल्या तिपटूरच्या एका मठातील स्वामीजींना अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे दाखवण्यात आले. ते त्यांचे असल्याचे भासवून त्यांच्याकडे ६ कोटी रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वामीजींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विद्या बिरादार पाटील नावाच्या महिलेला अटक केली आहे. विद्या हिने स्वतः कर्नाटक महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा, तसेच लोकायुक्त न्यायमूर्ती बी.एस्. पाटील यांची बहीण असल्याचे भासवून फसवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
१. विद्या हिने ३१ ऑगस्ट या दिवशी संबंधित स्वामीजींशी संपर्क साधून डी.बी. पल्लवी आणि सूर्यनारायण नावाच्या लोकांनी तुमच्याशी संबंधित व्हिडिओ देऊन तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे, असे सांगितले. यानंतर वारंवार स्वामीजींना भ्रमणभाष करून त्रास दिला. याला कंटाळून स्वामीजींनी महिलेला त्यांच्या कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधण्यास सांगितले.
२. बेंगळुरूतील गांधीनगरमध्ये विद्या अधिवक्त्यांना भेटली. या वेळी तिने तिच्याकडे अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगून ते सार्वजनिक न करण्यासाठी ६ कोटी रुपये द्यावेत, तसेच तत्काळ ५० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली.
३. माझ्यासारख्या दिसणार्या व्यक्तीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सिद्ध करण्यात आल्याचे स्वामीजींनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.