‘१८.१.२०२४ या दिवशी भक्तीसत्संग होता. त्या दिवशी सकाळपासूनच माझे मन आनंदी होते. ‘आजच्या भक्तीसत्संगात साक्षात् देवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ श्रीरामाचे गुणगान करणार आहेत आणि महती सांगणार आहेत’, असा माझ्या मनात विचार येऊन सतत श्रीरामाचाच नामजप होत होता. ‘कधी दुपारचे २.३० वाजतील’, असे मला वाटत होते.
१. श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ भक्तीसत्संगात बोलत असतांना आलेल्या अनुभूती
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात बोलण्यास आरंभ केला. तेव्हा ‘मला आश्रमातील वातावरण शांत झाले आहे’, असे जाणवले. ‘आश्रमातील सर्व साधक, झाडे आणि निर्जीव वस्तूही भक्तीसत्संग ऐकत आहेत’, असे मला सतत जाणवत होते.
आ. मला सगळीकडे आनंद जाणवत होता.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले, ‘आपण सूक्ष्मातून अयोध्येला जाऊन श्री रामलल्लाचे दर्शन घेऊया.’ त्या अयोध्येचे वर्णन करत असतांना मला ‘मी आश्रमात नसून अयोध्येतच आहे’, असे वाटत होते.
ई. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मुखातून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप ऐकतांना तो माझ्या अंतर्मनात जाऊन ‘शरिरातील सर्व पेशी राममय झाल्या आहेत’, असे वाटत होते.
२. श्रीरामाविषयीचे गीत ऐकतांना आलेली अनुभूती
सत्संगात ‘मेरे झोपडीके भाग आज खुल जाएंगे । राम आएंगे ।।’ हे गीत लागले. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) श्रीरामाच्या वेशातील छायाचित्र आले आणि ‘ते साक्षात् श्रीरामाच्या रूपात माझ्या हृदयात येऊन बसले आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटून माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
३. भक्तीसत्संग ऐकतांना ‘भूवैकुंठ असलेल्या रामनाथी आश्रमात श्रीरामाची स्थापना होत आहे’, असे जाणवणे
‘भक्तीसत्संग संपूच नये’, असे मला वाटत होते. २२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार होती; पण भक्तीसत्संग ऐकतांना ‘आजच हा सोहळा आहे’, असे मला वाटत होते. ‘श्रीरामाची स्थापना भूवैकुंठ असलेल्या रामनाथी आश्रमात होत आहे. सर्व साधक आनंदाने नाचत रामनाम घेत आहेत’, असे मला वाटत होते.
४. संपूर्ण आश्रम राममय झाला असून ‘मनात आनंदाच्या लाटा उसळत आहेत’, असे वाटणे
भक्तीसत्संग संपल्यावर मी भोजनकक्षात प्रसाद घेण्यासाठी गेले. तेव्हा तेथील साधकांकडे पाहून ‘प्रत्येकाच्या मनात केवळ ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप चालू आहे’, असे मला वाटत होते. ‘संपूर्ण आश्रम राममय झाला आहे. माझ्या मनात आनंदाच्या लाटा उसळत आहेत आणि हा आनंद केवळ प.पू. गुरुमाऊली देत आहेत’, असे मला वाटले.
५. रामनाथी आश्रमच ‘अयोध्या’ असल्याचे अनुभवणे
खरेतर आम्ही साधक अयोध्येला जाऊ शकत नाही; म्हणून प.पू. गुरुमाऊलींनी आम्हाला भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साक्षात् श्रीरामाचे दर्शन घडवले आणि ‘रामनाथी आश्रमच अयोध्या आहे’, असे आम्हाला अनुभवता आले.’
‘प.पू. गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे आज भक्तीसत्संगात अनुभवलेली सूत्रे लिहून देता आली, त्यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |