श्राद्धादि कर्माला विरोध करून स्मरणदिन आणि जयंती साजरी करणे, हा कोणता बुद्धीवाद ?

पितृपक्षाच्या निमित्ताने…

प.पू. स्वामी वरदानंद भारती

श्राद्धादि कर्माला विरोध करावयाचा, त्यामागील भूमिकेकडे दुर्लक्ष करावयाचे आणि निरनिराळे स्मरणदिन, जयंती साजर्‍या करण्यात उत्साहाने सहभागी व्हायचे, हा कोणता बुद्धीवाद ? निरनिराळे सत्कार समारंभ, पदवी पारितोषिकांचे वितरण, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, क्रांतीदिन, त्यानिमित्त होणारे निरनिराळे कार्यक्रम, शोभायात्रा, चर्चासत्रे, व्याख्यानमाला, ही सगळी निरनिराळ्या प्रकारची कर्मकांडे, श्राद्धे आणि तर्पणेच आहेत ना ? उलट कितीतरी पटीने अधिक खर्चिक, स्थलकाळाचा अपव्यय करणारी, भ्रष्टाचाराने बरबटलेली आणि परस्पर हेवेदावे वाढवणारी, अशी ही सर्व कामे आहेत. या सर्व समारंभाच्या निमित्ताने बहुधा गुंडबंडाची चलती होते ते निराळेच.

घरोघरी होणारी, होत असत ती श्राद्धादि कर्मकांडे या आधुनिक समारंभात्मक श्राद्धांपेक्षा कितीतरी पटीने साधी, सरळ आणि सात्त्विक होती. कृतज्ञतेसारखी उच्च भावना जोपासणारी होती. कौटुंबिक सद्भाव टिकवणारी आणि वाढवणारी होती अन् प्रत्येक घरी अशी कृत्ये होत असल्याने ‘आपण सर्व एक आहोत, परंपरेचे घटक आहोत, परस्परांचे समाजबांधव आहोत’, ही भावनिक एकता कळत न कळत प्रत्येकाच्या हृदयात जागृत होते. परंपरा जशाच्या तशा सांभाळण्याचे हे असे महत्त्व आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ‘वरदवाणी’)