पुणे विमानतळाला मिळणार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथे जे नव्या पद्धतीने विमानतळ बनवण्यात आले आहे, त्याचे नामकरण जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावे, अशी संकल्पना राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्या संकल्पनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला संमती मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुण्यात ‘महर्षी कर्वे शिक्षण संस्था’ येथे पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचे भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, मुरलीधर मोहोळ यांनी नावाच्या संदर्भातील प्रस्ताव सरकारला दिला होता, तो आम्ही स्वीकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी येत्या कॅबिनेटला तो प्रस्ताव मांडून संमत करून घेणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत.