सोलापूर – मोगलांच्या जुलमी अत्याचाराने ग्रासलेल्या भारताला छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मुक्त केले. छत्रपती शिवरायांनी घेतलेली शपथ हिंदु साम्राज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची शपथ होती, असे प्रतिपादन अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कथेच्या दुसर्या दिवशी म्हणजे २० सप्टेंबरला झालेल्या मार्गर्शनात ते बोलत होते. ‘शिवसंस्कार’ या विषयावर बोलतांना त्यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्याची शपथ आणि त्या काळातील संतकार्य आदींवर विवेचन केले.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या सर्वोत्तम गुरु असलेल्या त्यांच्या मातोश्री जिजामातांनी त्यांना घोडेस्वारी, राजनीतीशास्त्र, संस्कृत, व्यायाम, तलवारबाजी, दांडपट्टा, रामायण, महाभारत, व्यवस्थापनाचे धडे शिकवले. अत्याचाराचा नाश करणारा धर्माधिष्ठित राजा असावा या भूमिकेतून जिजामातांनी त्यांना घडवले. माझ्या पोटी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मावेत, असे भारतातील प्रत्येक स्त्रीला वाटले, तर देशाचे भाग्य पालटेल. हिंदुस्थानसाठी सर्वांत मोठी प्रेरणा छत्रपती श्री शिवरायच आहेत.
छत्रपती शिवरायांच्या समकालीन असलेले जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांनी समाजाची जागृती केली. हिंदवी स्वराज्यासाठीच्या संघर्षात योगदान देण्याची जनभावना त्या काळात सिद्ध होत गेली. आज घराचे उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचे असेल, तर प्रत्येक घरात शिवछत्रपतींची प्रतिमा लागली पाहिजे.’’
विशेष
याप्रसंगी चित्रपट कलावंत आमीर तडवळकर यांच्या ‘समर्पित’ नाट्यशाळेच्या कलाकारांनी छत्रपती शिवरायांनी घेतलेली ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’ हा प्रसंग नाट्यरूपातून सादर केला.