जगात सर्व लोक एकमेकांसमोर ‘आमचे तुमच्यावर पुष्कळ प्रेम आहे’, ‘तुम्ही आम्हाला पुष्कळ आवडता’, असे म्हणत दिखावा करतात. वास्तविक त्यांचे हे प्रेम हे वरवरचे असते; कारण त्यामागे त्यांचा काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. जोपर्यंत त्यांच्या स्वार्थाचे भरणपोषण होत रहाते, तोपर्यंत त्यांच्या प्रेमाचा हा दिखाऊपणा चालू राहतो. जेव्हा त्यांच्या स्वार्थाचे भरणपोषण बंद होते; तेव्हा त्यांचे हे दिखाऊपणाचे प्रेम आटलेले आहे, असे आपल्या लक्षात येते. त्या वेळी त्यांच्या प्रेमातील स्वार्थीपणा आपल्या लक्षात येतो. तोपर्यंत आपणही त्यांच्या खोट्या प्रेमाला भुलून त्यांचे कौतुक आणि सर्व प्रकारचे साहाय्य त्यांना करत असतो. त्या वेळी आपल्या पदराला किती खार लागला आहे, हा विचारही आपल्या मनात येत नाही; मात्र प्रेम करणार्या लोकांच्या स्वार्थाच्या तुंबडीतील आवक बंद झाली की, ते लोक दूर जातात. त्यांचे प्रेम संपलेले असते. ते आपल्याला आपत्काळात साहाय्याला येण्याचे टाळतात. तेव्हा ‘ते लोक स्वार्थी होते, प्रेमाचे नाटक करत होते’, याची आपल्याला जाणीव होते. तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेलेले असते.
वास्तविक संस्कारी व्यक्ती, ज्यांचे आपल्यावर खरेच प्रेम असते, ते आपत्काळातही आपल्या साहाय्याला धावून येतात. त्यासाठी ते कितीही कष्ट किंवा त्रास झाला, तरी मागे हटत नाहीत. तिथे आपल्याला माणुसकीचे दर्शन होते. तेव्हाच आपल्याला खर्या आणि खोट्या प्रेमाची ओळख होते. खरे प्रेम करणारे आणि आपण यांमध्ये वेगळा जिव्हाळा अन् ऋणानुबंध निर्माण होतो. वरील निकषांवरून इतरांकडून मिळणार्या प्रेमाची आपण परीक्षा करू शकतो.
अगदी जवळचे नातेवाईक, उदाहरणार्थ पत्नी, मुले, भाऊ आणि बहीण यांच्या संदर्भातही असेच असते, उदाहरणार्थ पत्नी खरे प्रेम करत असेल, तर कुठल्याही अत्यंत आपत्काळात, हालाखीच्या स्थितीत ती आपली साथ सोडणार नाही. आपल्या सर्व सुखदुःखात सहभागी होईल. आपण वयस्कर झालो, म्हातारे झालो आणि आपल्याला साहाय्याची आवश्यकता भासली, तर त्या वेळी आपला मुलगा साहाय्याला धावून आला, आपल्यासमवेत राहून तो आपली सर्व प्रकारे सेवा करू लागला, त्यासाठी वेळप्रसंगी त्याने सांसारिक सुखाचा त्याग केला, तर समजा त्याचे आपल्यावर खरे प्रेम आहे. ‘आपणही इतरांवर खरे प्रेम करायला पाहिजे’, याची आपल्याला आतून जाणीव होते. निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले प्रेमच ईश्वरचरणी रुजू होते. त्यालाच ‘प्रीती’ असे म्हणतात. साधनेत ‘प्रीती’ हा एक टप्पा आहे. प्रेमामध्ये अपेक्षा आणि स्वार्थ नसेल, तर तो एक प्रकारे आपल्याकडून त्यागच घडत असतो. खरे प्रेम हे त्यागाचे प्रतीक असल्याची अनुभूती घेतल्याने त्यातून मिळणारा आंतरिक आनंद हा अतुलनीय असतो.
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.