Ministry of Maharashtra : महाराष्‍ट्राच्‍या मंत्रालयातील अनेक विभाग अस्‍वच्‍छ : १९ सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता मोहीम

मंत्रालयाची इमारत

मुंबई, १८ सप्‍टेंबर (वार्ता.) – राज्‍याच्‍या प्रशासकीय कामकाजाचे मुख्‍यालय असलेल्‍या मंत्रालयात विविध विभागांमध्‍ये पडलेले अनावश्‍यक साहित्‍य, मार्गिकांमध्‍ये पडलेली अभिलेखाची कागदपत्रे, जीर्ण झालेली कपाटे यांमुळे मोठ्या प्रमाणात अस्‍वच्‍छता आहे. यामध्‍ये सुधारणा करण्‍याविषयी वेळोवेळी सूचना देण्‍यात येऊनही त्‍यामध्‍ये सुधारणा होत नसल्‍याची खंत मंत्रालयातील सामान्‍य प्रशासन विभागाकडून काढण्‍यात आलेल्‍या शासनाच्‍या आदेशात व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे. यामध्‍ये पालट होण्‍याच्‍या दृष्‍टीने मंत्रालयामध्‍ये १९ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत स्‍वच्‍छता मोहीम राबवण्‍यात येणार आहे.

अभिलेखांचे वर्गीकरण करणे, अनावश्‍यक कागदपत्रांची विल्‍हेवाट लावणे, भंगाराची विल्‍हेवाट लावणे, अनावश्‍यक खुर्च्‍या, पटल, खोके आदी मार्गिकमध्‍ये न ठेवणे, कपाटांची दुरुस्‍ती करणे, रंगरंगोटी करणे आदी सर्व कामे नियोजनबद्धपणे पूर्ण करण्‍याची सूचना सामान्‍य प्रशासन विभागाकडून देण्‍यात आली आहे. अधिकाधिक कागदपत्रे स्‍कॅनिंग करणे, त्‍यांची वर्गवारी करणे आदी कामे या कालावधीत करण्‍याची सूचना सामान्‍य प्रशासन विभागाने सर्व विभागांना दिली आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वृत्त आणि सुराज्‍य अभियानाकडून तक्रार !

मंत्रालयातील सर्व विभागांतील पटलावरील धारिकांचे ढिगारे आणि अस्‍ताव्‍यस्‍त साहित्‍य यांविषयी १४ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या संकेतस्‍थळावर ‘मंत्रालयातील कामकाज ‘पेपरलेस’; मात्र सर्व विभागांमध्‍ये ‘फाईल्‍स’चे ढीग’ हे वृत्त प्रसिद्ध करण्‍यात आले होते. या वृत्तावरून हिंदु जनजागृती समितीच्‍या सुराज्‍य अभियानाकडून २७ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍यासह राज्‍याचे प्रधान सचिव यांच्‍याकडे लेखी तक्रार करण्‍यात आली होती.


हे वाचा –

♦ मंत्रालयातील कामकाज ‘पेपरलेस’; मात्र सर्व विभागांमध्ये ‘फाईल्स’चे ढीग !
https://sanatanprabhat.org/marathi/720064.html