महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे ७१३ गुन्हे : गुन्ह्यांच्या नोंदींत कमालीची घट !

  • गुन्ह्यांत नाशिक प्रथम क्रमांकावर, तर मुंबईत गुन्ह्यांची संख्या झाली अल्प !

  • महसूल विभाग हा सर्वाधिक लाचखोर, दुसर्‍या क्रमांकावर पोलीस खाते !

मुंबई – लाच घेतल्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नोंदल्या जाणार्‍या गुन्ह्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ७१३ गुन्हे नोंदवले आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक, तर विशेषकरून मुंबईत अल्प गुन्हे नोंदवले गेले. नाशिकनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. ७१३ पैकी ६७८ गुन्हे प्रत्यक्षात लाच घेतल्याप्रकरणी, तर ३१ गुन्हे बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी आहेत. वर्ष २०१४ नंतर भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत सातत्याने घट होतांना दिसते.

१. लाचेच्या ६७८ गुन्ह्यांत ९९३ जणांना अटक करून ३ कोटी १८ लाख रुपयांची लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक लाचखोर महसूल विभागातील असून १८० गुन्ह्यांत २५२ जणांना अटक करण्यात आली आहे.

२. दुसर्‍या क्रमांकावर पोलीस खाते आहे.

३. भ्रष्टाचारप्रकरणी ठाणे, नागपूर, अमरावती आणि संभाजीनगर या शहरांतून एकूण ४१९ जणांना अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • गुन्ह्यांच्या नोंदींमध्ये घट होणे, याचा अर्थ भ्रष्टाचार अल्प झाला, असे म्हणता येणार नाही. विविध समाजघटकांमध्ये भ्रष्टाचारी राजकारणी अथवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्याविषयी भय असते. त्यामुळेही प्रत्येक वेळीच गुन्हा नोंद होतो, असेही नाही.
  • भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा केल्यासच भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल !