तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी प्रदूषण रोखण्याविषयी कायमस्वरूपी पर्याय काढावा !

 ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’ची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी !

प्रदूषणामुळे फेसाळलेली इंद्रायणी नदी

पुणे, ४ जानेवारी (वार्ता) – इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळलेली आहे. आम्ही नैमित्तिक इंद्रायणी स्वच्छता अभियान, उपोषणे इत्यादी मार्गाने प्रयत्न करत असतो; पण आम्हाला केवळ आश्वासने मिळत आहेत. आज वारकरीही सुरक्षित नाहीत, आम्हाला रस्त्याने चालणेही अवघड झाले असून नैमित्तिक प्रदक्षिणा करण्यासाठी पुष्कळ अडथळे येत आहेत. आपण आळंदी परिसरातील बांगलादेशी घुसखोरी, तसेच इंद्रायणी प्रदूषण आणि पंढरपूर क्षेत्रातही तीच परिस्थिती आहे म्हणून यासाठी कायमस्वरूपी पर्याय काढून न्याय द्याल, ही सर्व वारकर्‍यांच्या वतीने मी आपणास विनंती करत आहे, असे निवेदन ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. तीर्थक्षेत्र आळंदी क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढत चालले असून त्यानुसार लोकसंख्याही वाढत आहे. मोठ्या प्रमाणातील औद्योगीकरण, तसेच लोकसंख्या यांमुळे गृहनिर्माण प्रकल्पही वाढत आहेत. त्यातच नागरिक बांधकाम करतांना शोषखड्डे किंवा ‘सेफ्टिक टँक’चा वापर न करता बरेच सांडपाणी ओढ्यात, नदीत सोडले जाते. यामध्ये काही औद्योगिक क्षेत्रातील रसायनमिश्रित पाणीही नदीत मिसळण्याने वारंवार जलचरप्राणी मरणे, लोकांना त्वचाविकार होणे, शेतीमध्ये रासायनिक पाण्याचा दुष्परिणाम होणे, हे प्रकार वारंवार घडत आहेत.

२. असे पाणी भाविक-भक्त अत्यंत श्रद्धाभावाने प्राशन करतात. त्या पाण्यामुळे भयंकर रोग उद्भवतात.

संपादकीय भूमिका :

  • अशी मागणी का करावी लागते ? याविषयी प्रशासनाने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. खरेतर आपल्या देशातील नद्यांचे आध्यात्मिक दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. न्यायालयीन यंत्रणा, पोलीस यांनी एकत्र येऊन प्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. देशातील सर्वच नद्यांविषयी अशी कठोर दंडात्मक भूमिका घेतली, तर पुढे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालता येईल.