थोडक्यात महत्त्वाचे : माजी सरपंचावर प्राणघातक आक्रमण !, अंध मुलावर अत्याचार करणारे दोघे अटकेत !…

माजी सरपंचावर प्राणघातक आक्रमण !

शहापूर (ठाणे) – भूमीसंदर्भातील जुन्या वादातून तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी आक्रमणकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद करून कसारा पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून ४ जणांचा शोध चालू आहे.


अंध मुलावर अत्याचार करणारे दोघे अटकेत !

बुलढाणा – जिल्ह्यातील खामगाव शहरात एका अल्पवयीन मुलावर २ जणांनी अनैसर्गिक अत्याचार केले. पीडित मुलगा १४ वर्षांचा असून ४० टक्के अंध आहे. मुलांनी त्यरला जिल्हा परिषदेत शाळेत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. मुलाला वेदना होऊ लागल्याने त्याने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर खामगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका : अशांवर कठोर कारवाई होणार का ?


प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन !

डॉ. राजगोपाल चिदंबरम

मुंबई – देशाला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘पोखरण १’ आणि ‘पोखरण २’ या अणुचाचण्यांमध्ये मोलाची भूमिका बजावणारे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम् (वय ८९ वर्षे) यांचे ४ जानेवारीला पहाटे ३.२० च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात भरती करण्यात आले होते.


पैनगंगा खाण परिसरात वाघाचा मुक्त संचार

चंद्रपूर – १ आणि २ जानेवारीच्या रात्री वेकोलि वणी परिसरातील पैनगंगा कोळसा खाण परिसरात वाहन चालकांना पट्टेदार वाघ दिसला. तसेच नजीकच्या विरूर, गाडेगाव, सोनुर्ली, सांगोला आणि आवरपूर परिसरातही वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. वाघाच्या या उपस्थितीने स्थानिक रहिवासी आणि शेतकरी यांच्यात  भीती पसरली आहे. वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) जवळील एक प्रमुख रस्ता दक्षतेचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना गहू आणि हरभरा या पिकांची काळजी घेण्यासाठी शेतात जाण्यास अडचणी येत आहेत.


लाचखोर साहाय्यक निबंधक आणि सहकारी अटकेत !

गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी घेतली ६० सहस्र रुपयांची लाच

बदलापूर – इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी अंबरनाथच्या निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विजयसिंह पाटील ६० सहस्र रुपये लाच मागितली होती. (भ्रष्टाचाराने पोखरलेले प्रशासन ! – संपादक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून लाच स्वीकारतांना विजयसिंह पाटील यांना अटक केली. सहकारी संस्थाचे साहाय्यक निबंधक चेतन चौधरी यांच्यासाठीही ही लाच मागण्यात आली होती. दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त का करू नये ?