कोल्हापूर, ४ जानेवारी (वार्ता.) – कोल्हापूर शहराचा रंकाळा तलाव हा मानबिंदू असून याच्या सुशोभिकरणाच्या कामामुळे रंकाळ्याचे सौंदर्य खुलून दिसत आहे. अलीकडे रंकाळ्यावर विद्युत् दिवे आणि खांब यांची दुरवस्था करण्याचे प्रकार चालू झाले आहेत. हे झाल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही, तरी रंकाळा सुशोभिकरणाच्या अंतर्गत बसवलेले विद्युत् दिवे आणि खांब यांची हानी करण्यावर फौजदारी गुन्हा नोंद करा, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन उपायुक्त साधना पाटील यांनी स्वीकारले. (प्रशासनाला हे का दिसत नाही ? – संपादक)
या प्रसंगी ‘शहर सुधारणा समिती’चे संयोजक श्री. किशोर घाटगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, श्री. प्रसन्न शिंदे, हिंदु महासभेच्या महिला आघाडीच्या सौ. शीला माने, भाजपच्या सुजाता पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, रंकाळ्यावर विक्रीसाठी येणार्या परप्रांतीय फेरीवाल्याकडून रंकाळा खराब केला जात आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई व्हावी, तसेच रंकाळा सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी. कोट्यवधी रुपये निधी व्यय करून कोल्हापूरचा इतिहास दाखवणार्या चित्रशिल्पाप्रमाणे दुरवस्था होऊ नये, याची काळजी महापालिकेने घ्यावी.