सण-उत्सवांमागील अर्थशास्त्र !

विघ्नहर्त्या गणपतीचे आगमन कुटुंबामध्ये, सार्वजनिक ठिकाणी होतांना सर्वत्र चैतन्य आणि आनंद यांचे वातावरण असते. आतापर्यंत सण-उत्सव, परंपरा, कुंभमेळा यांची फक्त धार्मिकताच समजली; पण यातून निर्माण होणारी अर्थसंपत्ती भारतियांना लक्षात आलेली नाही. याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊ.

हिंदूंचे सण-उत्सव अर्थकारणाला गती प्रदान करणारे !

१. उत्पन्नाचा स्रोत बनलेली सण-उत्सवांची परंपरा

वर्षभरात अनेक सण-उत्सव वर्षभर मोठ्या प्रमाणात भारतात साजरे केले जातात. या सगळ्यातून निर्माण होणार्‍या अर्थशक्तीला अर्थशास्त्रामध्ये ‘Big M’ (सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा पैसा), असे म्हटले जाते. तो कसा कार्यरत होतो, ते पाहूया.

गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात अनुमाने ५ ते १० लाख वैयक्तिक गणेशमूर्ती असतात, तर अनुमाने २५ सहस्र ते १ लाख सार्वजनिक मंडळांमधून गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात बाजारपेठ ग्राहकांनी फुललेली असते. चार पैसे सढळ हाताने खर्च करण्याकडे बर्‍याच जणांचा कल असतो.

गणेशमूर्ती, मूर्तीकार, कारखान्यातील कामगार इत्यादींची संख्या एवढी प्रचंड आहे की, चीनलाही गणेशमूर्ती बनवण्याचा मोह आवरला नाही. गणेशासाठी केली जाणारी आरास, त्यासाठी लागणारे कागद, लाकूड, प्लास्टर ऑफ पॅरिस यांचे देखावे इत्यादी साहित्यासाठी लागणारी अर्थशक्ती, अमर्याद ‘क्रिएटिव्हिटी’ (सृजनशक्ती) आणि यांतून वाढणारी आर्थिक उलाढाल (टर्नओव्हर) प्रचंड असते.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

२. ‘पितांबरी पूजा किट (संच)’ची निर्मिती आणि त्यात होणारी वृद्धी !

पितांबरीमध्ये आम्ही या वेळी ‘पितांबरी पूजा किट’ निर्माण केले. एका ओळखीच्या आमदाराने (निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या) प्रारंभी आमच्याकडे २ सहस्र किटची मागणी केली. त्यातील १ सहस्र किटचे त्यांनी वाटप केले. ते त्यांना इतके आवडले की, त्यानंतर अजून १ सहस्र किटची त्यांनी मागणी केली. असे एकूण ३ सहस्र ‘पितांबरी पूजा किट’ आगाऊ पैसे देऊन त्यांनी विकत घेतले. नंतर ‘पितांबरी पूजा किट’ची मागणी वाढली.

३. उत्सवांच्या माध्यमातून होणारा व्यवसाय

गणेशोत्सवातून सार्वजनिक स्तरांतून ५० सहस्र कोटी ते १ लाख कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय होत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सरकारी किंवा खासगी सर्वेक्षण करणार्‍या संस्थांनी जर याचा सर्व्हे केला, तर या वेळी रोजगाराचे प्रमाण वाढून आपोआपच सर्व मार्केटमध्ये (बाजारामध्ये) तेजी येते.

४. ग्राहकांची मानसिकता समजून घ्या !

सणांच्या अनुषंगाने उद्योजकांनी एखादे उत्पादन/सेवा पुरवण्याच्या दृष्टीकोनातून पूर्वनियोजन करून ग्राहकांकडून होणार्‍या खरेदीच्या मानसिकतेचा लाभ करून घेतला पाहिजे. बर्‍याचदा प्रत्यक्ष विक्रीची वेळ आल्यावर फक्त ५ ते १० टक्के गिर्‍हाईकांना पुरेल एवढ्या वस्तूंची निर्मिती केली जाते, उदा. आम्ही मागील वर्षी ‘पितांबरी देवभक्ती गणेश उपासना’ अगरबत्ती बाजारात आणली. प्रारंभी आम्ही ५०० खोके बनवण्याचे ठरवले. एका खोक्यात ६० काड्या असतात, म्हणजे जवळपास ३० सहस्र अगरबत्ती काड्यांचे उत्पादन केले. अगरबत्तीची प्रत्यक्ष विक्री झाली, तेव्हा त्याची मागणी २ सहस्र खोक्यांपर्यंत गेली आणि आम्ही मात्र ५०० खोके विकल्याचा आनंद ढोल पिटून साजरा करत होतो; पण ‘वराती मागून घोडे’ या म्हणीप्रमाणे सण किंवा ती विशिष्ट वेळ गेल्यानंतर उत्पादन करण्यात काहीच अर्थ नसतो. हा एक धडाच जणू आमच्या चमूला मिळाला.

५. अर्थकारणाच्या दृष्टीने उद्योजकांसाठी पर्वणीचा काळ !

आपल्याला हिंदु सण-उत्सव आणि त्यातून साधले जाणारे अर्थकारण नीट समजलेले नाही. त्यामुळे त्याचा आपल्या व्यवसायासाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे, याचे आकलन होत नाही. त्यामुळेच एका मोठ्या व्यापारी सौद्यातून होणार्‍या लाभाला आपण मुकतो. उद्योजकाने जागरूक राहून व्यवसाय केला पाहिजे. वर्षातून एकदा येणार्‍या सण-उत्सवांची उत्पादने आणि सेवा यांच्याशी सांगड घातली पाहिजे. उद्योजकांसाठी सणांच्या काळातील उलाढाल खात्रीलायक आणि निर्णायक असते. या काळात अर्थव्यवस्थेला गती मिळते.

६. सण हे बाजारपेठेसाठी ‘महाईव्हेंट’ (मोठा उपक्रम) !

मनःशांती आणि चैतन्य लाभण्यासाठी भक्तगण सणांच्या काळात कितीही गैरसोय झाली, तरीही धार्मिक पर्यटनस्थळांना भेटी देतात. याचा अप्रत्यक्षरित्या लाखो भाविक व्यापार्‍यांचा लाभ होत त्यांची भरभराट करत आहे. सण हे बाजारपेठेसाठी ‘महाईव्हेंट’ आहेत. सण-उत्सव नाहीसे झाले, तर बाजारपेठ कोरडी पडेल अन् अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करील; म्हणूनच अर्थजगताशी निगडित प्रत्येकाने सणांचे ऋणी असले पाहिजे. उद्योजकांनी नेहमी म्हटले पाहिजे, ‘सणांचे ऋणी आम्ही !’ व्यापारी-उद्योजकांना येणार्‍या सर्व सणांच्या श्रीमंत शुभेच्छा !

– श्री. रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’, ठाणे.