सातारा, १५ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सव आणि इतर कार्यक्रमांमध्ये लेझर बीम लाईट लावण्यास प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून गणेशोत्सव मंडळासमोर ३ ठिकाणी लेझर बीम लाईट लावण्यात आले. या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
रविवार पेठेतील लोणार गल्ली येथील श्रीनाथ गणेशोत्सव मंडळासमोर ओमकार संजय कवठेकर यांनी लेझर बीम लाईट लावली. सदरबझार येथील नवीन म्हाडा कॉलनीतील श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळासमोर कैलास भंडारे यांनी, तर पिरवाडी येथील समृद्धी अपार्टमेंट गणेशोत्सव मंडळातील संतोष लक्ष्मण निकम यांनी लेझर बीम लाईट लावल्याविषयी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी सातारा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.