अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक सल्लागार बांगलादेशात !

बांगलादेश अंतरिक सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांची भेट घेणार

डोनाल्ड लू

ढाका – बांगलादेशातील सत्तापरिवर्तनानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे एक वरिष्ठ राजनैतिक सल्लागार डोनाल्ड लू शिष्टमंडळासह बांगलादेशात पोचले आहेत. बांगलादेशातील अंतरिम सरकारशी आर्थिक आणि व्यापार या सूत्रांवर ते चर्चा करणार आहेत. या शिष्टमंडळात दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेचे साहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रँडन लिंच यांचाही समावेश आहे. बांगलादेशातील सत्तापालटामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत डोनाल्ड लू बांगलादेशात पोचल्याने याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. ते बांगलादेशातील अंतरिम सरकारचे सल्लागार महंमद युनूस यांची भेट घेणार आहेत. तसेच हे शिष्टमंडळ अर्थ आणि वाणिज्य सल्लागार सालेहुद्दीन अहमद यांचीही भेट घेणार आहेत.

तत्पूर्वी बांगलादेशाचे परराष्ट्र सचिव एम्.डी. जशीम उद्दीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे आगमन हे बांगलादेशासोबतच्या संबंधांना अमेरिका किती महत्त्व देते, हे दर्शवते.

डोनाल्ड लू भारतालाही भेट देणार !

डोनाल्ड लू भारतालाही भेट देणार आहेत. ते नवी देहलीत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयांतील अधिकार्‍यांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे इंडो-पॅसिफिक सुरक्षाविषयक विभागाचे प्रधान उप-साहाय्यक सचिव जेडीदिया पी रॉयल या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. या वेळी तेजस लढाऊ जेटची इंजिने पुरवण्याच्या विलंबावरही चर्चा होऊ शकते.