Bangladeshi Fatwa On Durga Pooja : नमाजाच्‍या ५ मिनिटे आधी मंदिरातील पूजा आणि ध्‍वनीक्षेपक बंद करा ! – महंमद जहांगीर आलम चौधरी, गृहमंत्रालय, बांगलादेश

बांगलादेशच्‍या गृहमंत्रालयाचा फतवा

गृह सल्लागार लेफ्‍टनंट जनरल (निवृत्त) महंमद जहांगीर आलम चौधरी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्‍या गृह मंत्रालयाने १० सप्‍टेंबर या दिवशी तेथील अल्‍पसंख्‍य असलेल्‍या हिंदूंसाठी एक फतवा काढला आहे. ‘काही दिवसांनी चालू होणार्‍या श्री दुर्गापूजा उत्‍सवाच्‍या कालावधीत मशिदीत होणारी अजान आणि नमाज यांच्‍या ५ मिनिटे आधी श्री दुर्गादेवीची पूजा आणि ध्‍वनीक्षेपक प्रणाली बंद करावी’, असे आदेशात म्‍हटले आहे. बांगलादेशी प्रसारमाध्‍यमांनी या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे.

१. गृह सल्लागार लेफ्‍टनंट जनरल (निवृत्त) महंमद जहांगीर आलम चौधरी यांनी सचिवालयात बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्‍या नेत्‍यांची भेट घेतली. या बैठकीनंतर महंमद जहांगीर आलम चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. बांगलादेशमध्‍ये गृह सल्लागार हे पद मंत्रीपदाच्‍या दर्जाचेच आहे.

२. ‘मूर्ती बनवण्‍याच्‍या वेळेपासून हिंदूंच्‍या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. पूजा मंडपांमध्‍ये २४ घंटे सुरक्षा रहावी, यावर आम्‍ही चर्चा केली आहे’, असा दावाही आलम यांनी केला आहे.

३. ‘श्री दुर्गापूजा हा बांगलादेशी हिंदूंचा सर्वांत मोठा सण आहे. यावर्षी बांगलादेशात एकूण ३२ सहस्र ६६६ पूजा मंडप उभारण्‍यात येणार आहेत. ढाका दक्षिण शहर आणि उत्तर महानगरपालिकेमध्‍ये अनुक्रमे १५७ आणि ८८ मंडप उभारण्‍यात येणार आहेत. गेल्‍या वर्षी ३३ सहस्र ४३१ पूजा मंडप उभारण्‍यात आले होते’, असे आलम यांनी सांगितले.

बांगलादेशी हिंदू संतप्‍त !

महंमद जहांगीर आलम चौधरी यांनी यांनी कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे सूत्र उपस्‍थित करत हिंदूंच्‍या धार्मिक अधिकारांना बाधा आणणारा हा फतवा जारी केला आहे. हा आदेश तालिबानी असल्‍याची संतप्‍त प्रतिक्रिया येथील हिंदूंनी व्‍यक्‍त केली आहे.

संपादकीय भूमिका 

भविष्‍यात बांगलादेशात ‘मंदिरांना टाळे ठोका’, ‘पूजा-अर्चा बंद करा’ आणि पुढे ‘हिंदूंनी धर्मांतर करावे’, असे फतवे निघाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !