दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : विधानसभेत एम्.आय.एम्. स्वबळावर लढणार !; दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र !

विधानसभेत एम्.आय.एम्. स्वबळावर लढणार !

५ उमेदवारांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ७ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता एम्.आय.एम्.कडूनही ५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

एम्.आय.एम्.ने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. महाविकास आघाडीकडून कोणताही निर्णय न झाल्याने त्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये १० सप्टेंबरला ही घोषणा केली.


दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र !

मुंबई – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नागरिकांना भेसळविरहित अन् सकस खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुधातील भेसळ ओळखतांना अन्न निरीक्षकांना अवघड जाते. त्यावर उपाय म्हणून आता अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना ‘मिल्कोस्कॅन’ यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वरवरची उपाययोजना काढणारे प्रशासन ! – संपादक)


घोडबंदर (ठाणे) येथे बस मेट्रोच्या खांबाला धडकली !

८ जण घायाळ

ठाणे – अंबेजोगाई येथून बोरीवलीच्या दिशेने जाणार्‍या एस्.टी.चा १० सप्टेंबरला पहाटे ५.३० वाजता घोडबंदर येथील ओवळा नाका परिसरात अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एस्.टी. मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या धडकेमध्ये एस्.टी.च्या पुढील भागाची हानी झाली, तर ८ जण घायाळ झाले. घायाळ झालेल्यांना उपचारासाठी ब्रह्मांड आणि मानपाडा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


१० वर्षीय मुलीवर दोघांकडून बलात्कार !

नालासोपारा (पालघर) – येथील शिर्डीनगर परिसरात श्री गणेश आगमन सोहळा पहाण्यासाठी १० वर्षीय मुलगी गेली होती. तेथून घरी परतत असतांना २ व्यक्तींनी तिला रस्त्यात अडवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना तात्काळ फाशीच द्यायला हवी !