व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !
‘व्यायामाच्या संदर्भात स्वतःकडून वास्तवाला धरून अपेक्षा ठेवाव्यात. जर अपेक्षा अवास्तव किंवा मोठ्या असतील, तर त्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते आणि व्यायामात नियमितता राखणे अवघड होऊ शकते.
(भाग ८)
१. स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायामाला आरंभ करून हळूहळू व्यायामाचा वेळ वाढवल्याने व्यायाम करण्यात नियमितपणा येईल !
समजा, तुम्ही प्रतिदिन १ घंटा व्यायाम करायचे ठरवले असेल; पण सध्या तुमची शारीरिक क्षमता अल्प असेल, तर १ घंटा व्यायाम करणे तुमच्यासाठी पुष्कळ कठीण होईल आणि दुसर्या दिवशी तुम्हाला अंगदुखी किंवा थकवा जाणवेल. या अनुभवामुळे तुमची दुसर्या दिवशी व्यायाम करण्याची इच्छा न्यून होईल. यापेक्षा प्रतिदिन २० मिनिटे व्यायाम करण्यास आरंभ करून हळूहळू वेळ वाढवा. त्यामुळे तुमचे शरीर हळूहळू व्यायामाची सवय करून घेईल आणि व्यायाम करण्यात नियमितता राहील.
२. ‘व्यायाम केल्याने स्वतःत पालट होण्यास वेळ लागतो’, हे जाणा !
व्यायाम करण्यास आरंभ केल्यावर बहुतेक जणांना स्वतःमध्ये लगेचच पालट होण्याची अपेक्षा असते, उदा. अल्पावधीत बरेच वजन न्यून होणे, शरिराला सुरेख आकार येणे इत्यादी. अशा अवास्तव अपेक्षा ठेवून व्यायाम करतांना अतीजोर लावल्याने ते अपायकारक होऊ शकते, तसेच अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराशाही येऊ शकते. त्यामुळे व्यायाम करण्याचा उत्साह मावळतो.
प्रतिदिन होणार्या शारीरिक हालचालींमुळे दमछाक होऊ लागल्यास े शरीर स्वतःला सावरत पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे काही दिवस व्यायाम केला, तरीही शरिरात लगेच पालट होत नाहीत. ‘वजन न्यून करणे, शरिराला आकार देणे, तसेच शारीरिक क्षमतेत लक्षणीय सुधारणा जाणवणे’, या सर्वांना वेळ लागतो; पण ‘ते अशक्यही नसते’, हे ध्यानात ठेवावे !
स्वतःच्या मर्यादेपलीकडे जाऊन व्यायाम करण्यापेक्षा ‘व्यायामात सातत्य ठेवणे आणि टप्प्याटप्प्याने व्यायामाचा कालावधी आणि जोर वाढवत जाणे’, हे प्रगतीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असते. असे केल्याने आरंभीच निराशा न येता मन उत्साही राहून व्यायाम पूर्ण करत असल्याचा आनंद घेता येतो आणि हेच सर्वांत महत्त्वाचे असते.’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (११.८.२०२४)