उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नियंत्री जगताप ही या पिढीतील एक आहे !
वर्ष २०१६ मध्ये ‘कु. नियंत्री जगताप हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे. पालकांनी तिच्यावर केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि भाव यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१०.९.२०२४ (भाद्रपद शुक्ल सप्तमी) या दिवशी कु. नियंत्री जगताप हिचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. नियंत्री जगताप हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. नीटनेटकेपणा
‘कु. नियंत्री स्वतःच्या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवते.
२. वक्तशीरपणा आणि परिपूर्ण कृती करणे
नियंत्री स्वतःची सर्व कामे वेळेत पूर्ण करते. तिला सांगितलेली कोणतीही सेवा ती पूर्ण करते. तिला अभ्यास करायचा असला, तर ती तो पूर्ण करूनच जेवण करते.
३. साहाय्य करणे
नियंत्री सुटीमध्ये मला ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाच्या सेवेत साहाय्य करते. ती मला संगणकीय माहिती भरून देते. ती मला स्वयंपाक घरातील कामांतही साहाय्य करते.
३ अ. पलंगावरून खाली पडलेल्या आजीला तत्परतेने साहाय्य करणे : एकदा माझ्या सासूबाई रात्री झोपल्या असतांना पलंगावरून खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. त्या वेळी नियंत्रीने तत्परतेने आजीच्या डोक्याला औषध लावले, तसेच आजीला विभूती लावून तिला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगितले.
४. देवावर आणि परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा असणे
नियंत्री तिच्या पटलावर ठेवलेल्या श्रीकृष्ण आणि श्री गणेश यांच्या चित्रांना, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला प्रार्थना करून अभ्यास करते. ती परीक्षेच्या वेळी आध्यात्मिक उपाय, दत्तगुरु अन् श्रीकृष्ण यांचा नामजप करते.
५. सात्त्विक कृतींची आवड
ती श्रीकृष्णाची बालरूपातील चित्रे काढते. सणांच्या वेळी ती घरात रांगोळी काढते. देवघराची स्वच्छता करून, देवाला गंध आणि हळदी-कुंकू लावते. ती देवघरासमोर फुलांची रचना करते, तसेच तुळशीचे पूजनही करते.
५. चुकांविषयी गांभीर्य असणे
ती तिची चूक लगेच स्वीकारून क्षमायाचना करते. ती स्वभावदोष-अहं यांच्या सारणीमध्ये स्वतःच्या चुका लिहिते.
६. धर्माभिमान
नियंत्रीच्या शाळेत सामाजिक विज्ञान (‘सोशल सायन्स’) या विषयामध्ये त्यांना मोगलांविषयीचे धडे अधिक आहेत; पण हिंदु क्रांतीकारक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय अल्प माहिती आहे. त्यामुळे तिला हा विषय आवडत नाही आणि ती त्या विषयाचा अभ्यासही करत नाही.
७. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती भाव
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सर्वांवर निरपेक्ष प्रेम करतात. ‘साधकांमध्ये कितीही स्वभावदोष असले, तरी गुरुदेव सर्वांना स्वीकारतात’, असे नियंत्री सांगते. दहावीच्या परीक्षेत तिला
९२ टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा होती; परंतु तिला ९५ टक्के गुण मिळाले. त्या वेळी ‘गुरुकृपेमुळे मला इतके गुण मिळाले’, असे म्हणून तिला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली.
– सौ. दीप्ती जगताप (कु. नियंत्रीची आई), बेंगळूरू, कर्नाटक. (९.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.