विक्रोळीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – विक्रोळीत चक्क सोनेरी कोल्हा दिसल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. विक्रोळी पूर्व येथील कन्नमवारनगर येथील रहिवाशांनी दोन दिवसांपूर्वी लांडगासदृश प्राणी पाहिला. या प्राण्याकडून स्थानिक कुत्र्यांवर आक्रमणे होत असल्याची माहिती रहिवाशांनी मुंबई परिक्षेत्र वनविभागाला दिली आहे.

एकेकाळी मुंबईत घनदाट जंगल होते. मुंबईतील टेकड्यांवर असंख्य पशूपक्ष्यांच्या प्रजाती आढळत होत्या. कालौघात त्यांची संख्या अल्प झाली. सोनेरी कोल्हे प्रजातींसह कोल्हे विक्रोळी (पूर्व) आणि कन्नमवारनगरच्या किनारी प्रदेशात आणि आसपासच्या खारफुटीच्या जंगलात रहातात. सोनेरी कोल्ह्यांना पाहिल्यावर कुत्रे जोरात भुंकतात. या भुंकण्याचा आणि कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज अनेक नागरिकांनी ऐकला आहे.

सोनेरी कोल्हा कांदळवन परिसंस्थेतील प्रमुख सस्तन प्राणी आहे. मुंबईचा पश्चिम किनारा, मध्य मुंबई आणि नवी मुंबईतील काही भाग, तसेच ठाणे खाडी येथे कांदळवनाचा परिसर आहे. विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली, विरार, चेंबूर येथील कांदळवन क्षेत्रालगतच्या मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

कर्नाळा येथे सिंहाचे सीसीटीव्हीत दर्शन झाल्याची अफवा

पनवेल – येथून मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलनंतर लागणार्‍या कर्नाळा या किल्ल्याच्या परिसरातील पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये सिंह रस्त्यावरून फिरत असल्याचे दिसत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असला, तरी ही अफवा असल्याचे वृत्त त्यानंतर आले आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे समजते.