दगडूशेठ गणपतीसमोर ३५ सहस्र महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती !

उपक्रमाची नोंद ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली !

दगडूशेठ गणपतीसमोर ३५ सहस्र महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ३५ सहस्र महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिला या उपक्रमासाठी उपस्थित होत्या. श्री गणेश नामाचा जयघोष करत अथर्वशीर्षासह महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले. या उपक्रमाचे यंदा ३९ वे वर्ष होते. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक आणि महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला.