‘धर्मशास्त्रामध्ये सोने, चांदी अथवा माती यांपासूनच मूर्ती बनवावी’, असा स्पष्ट उल्लेख असल्याने या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य आहे. येथे ‘व्यावहारिकदृष्ट्या मातीपासून मूर्ती बनवण्याचा एकच पर्याय दिला आहे’, हे स्पष्ट आहे. ‘धर्मसिंधू’ या ग्रंथातही ‘विनायकाच्या व्रतासाठी मृण्मयी म्हणजे मातीची मूर्ती बनवावी’, असे सांगितले आहे. अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती चिकणमातीपासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी. ती नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे श्री गणेशाची स्पंदने मूर्तीकडे आकृष्ट होतात आणि प्रदूषणही होत नाही. श्री गणेशचतुर्थीला गणेशाचे पूजन करण्यासाठी आणावयाची मूर्ती एक ते दीड फूट उंच असावी, ती पाटावर बसलेली असावी. मूर्ती डाव्या सोंडेची असावी. (दैनिक ‘सनातन प्रभात’)