पुष्कळ संवेदनशील सूत्र असल्याने यावर कुणीही विश्वास ठेवू नये ! – महापालिका आयुक्त

पिंपरीतील (पुणे) छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याला तडे गेल्याचे छायाचित्र प्रसारित

पिंपरी-चिंचवड – येथे छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारला जात आहे; मात्र पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला तडा गेला. तसे छायाचित्र सामाजिक माध्यमावर प्रसारित झाल्याने उलट-सुलट चर्चा रंगलेल्या आहेत. महापालिका या पुतळ्यासाठी एकूण ४७ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. देहलीमध्ये हा पुतळा साकारून याचे भाग पिंपरीत आणले जात आहेत. हा पुतळा प्रत्यक्षात उभारायला वर्ष २०२५ उजाडेल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सांगण्यात येत आहे; मात्र तत्पूर्वीच पुतळ्याच्या पायाला तडा गेल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे आहे का ?

असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘याविषयी आताच असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. माझी नागरिकांना विनंती आहे, हे पुष्कळ संवेदनशील सूत्र आहे, यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांकडून सांगण्यात आले.

आयुक्तांनी पुढे म्हटले आहे की, आज ज्या बातम्या आणि छायाचित्रे सामाजिक माध्यमावर प्रसारित होत आहेत, ते पुतळ्याच्या ठिकाणचे नसून जी  ‘फॅब्रिकेशन शेड’ आहे, त्या ठिकाणचे छायाचित्र घेऊन प्रसारित केले जात आहेत. खर्‍या अर्थाने हा खोडसाळपणा केला जात आहे. पुतळ्याची उभारणी झालेली नाही, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तो उभारला जाईल.