भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचे आवाहन
पुणे, ४ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवामध्ये आवाजाची मर्यादा पाळा. आवाज मोठा ठेवू नका. पुष्कळ काळासाठी मोठा आवाज ऐकणे आरोग्यासाठी चांगले नाही. धार्मिक गाणी लावूया. बिभत्स गाणी लावू नका. अंगविक्षेप करून नृत्य करू नका. गणेशोत्सव आपण सर्वांनी आनंदाने साजरा करूया, असे आवाहन भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. समाजिक माध्यमांवर त्यांनी तशी एक चित्रफीत प्रसारित केली आहे.
प्रा. डॉ. (सौ.) कुलकर्णी पुढे म्हणाल्या, ‘‘ धार्मिक आणि देवतांना आवडणारी गाणी निवडूया. ढोल-ताशा हे आपले पारंपरिक वाद्य आहे. त्यातही ताल आहे, गोडवा आहे. अनेक पथकांमध्ये वादकांची संख्या अल्प ठेवून वादन करू शकतो. आवाजाची मर्यादा आणि गाण्यांची निवड याची गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी काळजी घेतील, अशी अपेक्षा करते. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !’’