चुकीचे वृत्त प्रसारित केल्‍यावरून प्रसिद्ध केलेली क्षमायाचना ठळकपणे न प्रकाशित केल्‍याने पुन्‍हा प्रकाशित करा ! – Gujarat High Court

गुजरात उच्‍च न्‍यायालयाचा ‘टाइम्‍स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्‍सप्रेस’ आणि ‘दिव्‍य भास्‍कर’ यांना आदेश

कर्णावती (गुजरात) – गुजरात उच्‍च न्‍यायालयाने ‘टाइम्‍स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्‍सप्रेस’ आणि ‘दिव्‍य भास्‍कर’ या दैनिकांना न्‍यायालयीन कार्यवाहीचे चुकीचे वृत्त प्रसारित केल्‍यावरून दैनिकात क्षमा प्रसिद्ध करण्‍याचा आदेश दिला होता. त्‍यानुसार या दैनिकांनी क्षमायाचना प्रसिद्ध केली; मात्र ही क्षमायाचना ठळक अक्षरात प्रसिद्ध केले नाही, असे उच्‍च न्‍यायालयाने सांगत पुन्‍हा क्षमा प्रसिद्ध करण्‍याचा आदेश दिला आहे.

१. मुख्‍य न्‍यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्‍यायमूर्ती प्रणव त्रिवेदी यांच्‍या खंडपिठाने म्‍हटले की, २३ ऑगस्‍ट २०२४ या दिवशी या ३ वृत्तपत्रांनी प्रकाशित केलेली क्षमायाचना ठळक अक्षरात नव्‍हती किंवा ठळकपणे दिसेल, अशी प्रकाशित केली नाही, जसा आदेश देण्‍यात आला होता.

२. यावर अधिवक्‍त्‍याने ‘क्षमा काळ्‍या, ठळक अक्षरांत प्रकाशित केली’, असे सांगितले.

३. मुख्‍य न्‍यायमूर्ती अग्रवाल म्‍हणाल्‍या की, ती कुणीही वाचू शकत नाही. क्षमायाचना कशासाठी आहे, हे तुम्‍ही संपूर्ण मथळ्‍यात द्यायला हवे होते. क्षमायाचना कशासाठी आहे हे कुणाला समजेल ? चुकीच्‍या वृत्तासाठी तुम्‍ही क्षमा मागायला हवी होती. तशी क्षमा मागूनच आमच्‍या समोर यायला हवे होते.

काय आहे प्रकरण ?

१३ ऑगस्‍ट या दिवशी न्‍यायालयाने टाइम्‍स ऑफ इंडिया, इंडियन एक्‍सप्रेस आणि दिव्‍य भास्‍कर या दैनिकांच्‍या संपादकांना नोटिसा बजावल्‍या होत्‍या. न्‍यायालयाने त्‍यांना  अनुदानित अल्‍पसंख्‍यांक संस्‍थांच्‍या अधिकारांशी संबंधित प्रकरणातील न्‍यायालयाच्‍या कार्यवाहीचे वृत्त प्रसारित करतांना ‘चुकीचे आणि विकृत वर्णन’ केल्‍याबद्दल स्‍पष्‍टीकरण मागितले होते. वृत्तपत्रांनी नंतर न्‍यायालयात सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात क्षमा मागितली; परंतु न्‍यायालयाचे समाधान झाले नाही. त्‍यानंतर २२ ऑगस्‍टला न्‍यायालयाने क्षमायाचना त्‍यांच्‍या संबंधित वृत्तपत्रांमध्‍ये अशा प्रकारे प्रकाशित करण्‍याचा आदेश दिला की, त्‍यामुळे न्‍यायालयाचे निरीक्षण नोंदवण्‍यात पत्रकार आणि संपादक चुकीचे होते हे स्‍पष्‍ट होईल; परंतु तशा प्रकारे या दैनिकांनी क्षमायाचना प्रकाशित न केल्‍याने न्‍यायालयाने त्‍यांना फटकारत पुन्‍हा ठळकपणे क्षमायाचना प्रकाशित करण्‍याचा आदेश दिला.