श्रद्धा आणि धीर !

२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘श्रद्धा हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग, प्राचीन काळापासून असलेली श्रद्धेची महती आणि नितांत श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

लेखांक क्र. १ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830595.html

५. श्रीमद्आद्यशंकराचार्य यांनी केलेली श्रद्धेची व्याख्या

श्रद्धेची सर्वांत उत्कृष्ट व्याख्या आचार्यांनी केली आहे. श्रीमद्आद्यशंकराचार्य यांनी केलेली व्याख्या नितांत सुंदर आणि स्वयंस्पष्ट म्हणून ग्राह्य धरायला अडचण नाही. आचार्यांच्या ‘सर्वेवेदांतसिद्धांतसार संग्रह’ या ग्रंथात त्यांनी म्हटले आहे की,

गुरुवेदान्तवाक्येषु बुद्धिर्या निश्चयात्मिका ।
सत्यमित्येव सा श्रद्धा निदानं मुक्तिसिद्धये ।।

– सर्ववेदान्तसिद्धान्तसारसङ्ग्रह, श्लोक २१०

अर्थ : गुरु आणि वेदांतवाक्ये यांच्या ठिकाणी जी निश्चयात्मिका सत्यस्वरूपिणी बुद्धी आहे, तीच श्रद्धा असून मोक्षसिद्धीचा मार्ग आहे.

६. जीवनात ठेवलेल्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी श्रद्धा हवी !

जीवनात प्रत्येकासमोर एक लक्ष्य असते, मग त्या लक्ष्यापाशी पोचेपर्यंत आपल्याकडे काय असते ?, तर केवळ श्रद्धा ! ‘मी चालायला प्रारंभ केलेला आहे आणि तिथे मी पोचणारच’, अशी दृढ श्रद्धा ! समजा आपल्याला एका गावी जायचे आहे. तिथे आपण पूर्वी कधीही गेलेलो नाही. मग त्या गावाला जाणारा रस्ता, तिथे आपल्याला नेणारा चालक आणि मार्गदर्शक यांच्यावर विश्वास ठेवणे भागच आहे. नाही तर तुम्ही त्या गावी पोचणार कसे ? मग पोचायला किती काळ लागेल, वाटेत काय अडचणी येतील इत्यादी सर्व प्रश्न गौण आहेत.

७. गुरुआज्ञेचे महत्त्व

‘काही झाले, तरी गुरूंच्या आज्ञेचे पालन झाले पाहिजे. गुरु नसतील, तिथे शास्त्रआज्ञा पालन झाली पाहिजे. जिथे शास्त्रआज्ञेमध्ये दोन मते निघतील, तिथे मात्र अंतिम निर्णय गुरुआज्ञेचा असेल !’

८. गुरुआज्ञेनुसार श्रीरामचंद्रांनी त्राटिकेचा केलेला वध !

‘वनवासापूर्वी जेव्हा प्रभु रामचंद्र महर्षि विश्वामित्रांसमवेत यज्ञरक्षणासाठी बाहेर पडले, तेव्हा वनामध्ये त्यांच्यासमोर त्राटिका राक्षसीण उभी राहिली. प्रभु रामचंद्रांना असा प्रश्न पडला, ‘ही स्त्री आहे, हिच्यावर मी शस्त्र कसे चालवणार ?’ तेव्हा विश्वामित्रांनी आज्ञा केली, ‘‘मार ही त्राटिका रामचंद्रा !’’ आपण गीतरामायणामध्ये हे गीत ऐकले असेल. विश्वामित्रांनी सांगितले, ‘‘स्त्रीवर शस्त्र चालवू नये’, असे जरी धर्म सांगत असला, तरी ‘राक्षसाचे निर्दालन करावे’, असेही धर्म सांगतो. दोन्ही दृष्टीकोनांतून जो विचार करतो, तो धर्म होय; पण सध्या राक्षसांचे निर्दालन करणे अधिक महत्त्वाचे आहे; म्हणून तू त्राटिकेवर तात्काळ बाण चालव आणि तिला मार.’’ शास्त्र आज्ञा जेव्हा दोन बाजूंनी निर्णय देते, तेव्हा गुरुआज्ञा अंतिम समजून प्रभूंनी तिच्यावर बाण सोडला. ही रामचरित्रातील महत्त्वाची घटना आहे. ही घटना वगळता प्रभु रामचंद्रांनी संपूर्ण जीवनात बाकी कुठल्याही स्त्रीवर कधीही शस्त्र उगारल्याचे आढळत नाही; पण गुरुआज्ञेनुसार त्राटिकेचा वध केल्याचे मात्र आढळते. सद्गुरूंची आज्ञा आणि शास्त्रआज्ञा जो पाळतो, त्याची निश्चयात्मक बुद्धी दृढ झालेली असते. तिलाच ‘श्रद्धा’ असे म्हणतात.’

९. श्रद्धेचे पृथक्करण 

‘श्रद्धा हा अंतःकरणाचा धर्म आहे किंवा अंतःकरणाचा व्यापार आहे. मग योग्य रितीने श्रद्धा निर्माण व्हावी, ती दृढ व्हावी, यासाठी आवश्यक काय ठरते ? तर तसे सुपीक मन सिद्ध असायला हवे. तसे झाल्यासच ती श्रद्धा दृढ होते.’

(समाप्त)

– प.पू. सद्गुरु बापटगुरुजी

(साभार : मासिक ‘संतकृपा’, एप्रिल २०१६)