१. जो धैर्यवान असतो, तोच श्रद्धा ठेवू शकतो !
‘श्रद्धा’ याचा अर्थ आपण ठरवलेल्या इच्छित अशा संकल्पावरील परमोच्च विश्वास ! तो पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली योग्य ती सहनशक्ती म्हणजे धीर ! ‘धैर्य’ या शब्दापासून ‘धीर’ हा शब्द निर्माण झाला आहे. श्रद्धा आणि धैर्य हे दोन्ही गुण एकमेकांचा हात धरून चालतात. जो धैर्यवान असतो, तोच आयुष्यात श्रद्धा ठेवू शकतो. तो श्रद्धावंत असतो. त्याचाच धीर टिकतो. श्रद्धा आणि धीर हे दोन महत्त्वाचे गुण प्रभु रामचंद्रांनी आयुष्यभर समवेत तोललेले आढळतात.
२. श्रद्धा हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग !
श्रद्धा आणि धीर हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनाचा महामंत्र ठरू शकेल. वस्तूतः श्रद्धा हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपण स्वतःचे अवलोकन केले, तरी ते आपल्या लक्षात येईल. आपण प्रतिदिन रात्री झोपी जातो, ते कशाच्या बळावर ? तर तिथे आपली श्रद्धा असते की, आपण सकाळी निश्चित उठणार आहोत; म्हणूनच आपल्याला शांत झोप लागते. आपल्याला जर कुणी सांगितले, ‘उद्याची सकाळ तू बघणार नाहीस.’ ‘खरच आपण सकाळी उठू कि नाही ?’, अशी पुसटशी शंका जरी कुठे अंतर्मनात आली, तरी झोप लागणार नाही. करून बघा प्रयोग ! कधी सकाळ होते आणि तेव्हा काय होणार आहे, ही चिंता तुम्हाला रात्रभर झोपूच देणार नाही ! कुणी कितीही नास्तिक असला, तरी त्याच्यातही ‘श्रद्धा’ हा गुण असतोच असतो. त्याचेच हे लहानसे उदाहरण !
३. प्राचीन काळापासून असलेली श्रद्धेची महती !
श्रद्धा ही जीवनामध्ये एवढी महत्त्वपूर्ण असल्याने तिची महती वेदकाळापासून गायली गेली आहे.
अ. ऋग्वेदाच्या १० व्या मंडलामध्ये १५१ वे सूक्त हे ‘श्रद्धासूक्त’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. त्यात अगदी पाचच ऋचा आहेत. त्याद्वारे ब्रह्मतत्त्वाकडे मागणे मागितले आहे की, माझी श्रद्धा तू बलवान कर. माझी श्रद्धा आणि निष्ठा दृढ राहू दे.
आ. त्या काळापासून श्रद्धेवर बरेच काही लिहिले गेले आहे. श्रद्धेच्या बळावर काय वाट्टेल ते होऊ शकते. यात अवास्तव असे काहीच नाही. मुळात श्रद्धा ही सात्त्विक भावना आहे. जिथे उत्कृष्टता, उत्तुंगता आणि अभेदत्व आढळते, तिथे त्या गुणांच्या आधाराने श्रद्धा जागृत होते. ही श्रद्धा त्या गुणांना स्वतःतही स्फुरित करते. थोडक्यात म्हणजे सर्व गुणांचा अतिशय उच्च असा उत्कर्ष होतो तो श्रद्धेमुळे !
इ. श्रद्धासूक्ताची द्रष्टा ‘श्रद्धा कामायनी’ आहे. ‘कामायनी’ म्हणजे कामना किंवा सात्त्विक िवचारांचे अधिष्ठान असलेली देवता, तीच ‘श्रद्धा’, असा ऋग्वेद रचनाकारांनी उल्लेख केलेला आहे.
ई. ‘तैत्तिरीय ब्राह्मण’ ग्रंथामध्ये याचा अर्थ स्पष्ट करतांना म्हटले आहे की, ‘श्रद्धां कामस्य मातरम् । हविषा वर्धयामसि ।’ (तैत्तिरीयब्राह्मण, काण्ड २, प्रपाठक ८, खण्ड ८, अनुवाक ८) म्हणजे ‘श्रद्धा ही कामनेची माता किंवा सद्विचारांची जननी आहे. तिला निरंतन वाढवा.’ ‘श्रत् सत्यं धीयते यत्र सा श्रद्धा ।’, म्हणजे ‘जेथे सत्य प्रतिष्ठित आहे, ती श्रद्धा होय.’
उ. हृदयात असत्याला हटवून सत्याची स्थापना करणे, म्हणजे श्रद्धा होय. हृदयामध्ये आपण जे तत्त्व, जी वस्तू, व्यक्ती किंवा प्रतिमा स्थापित करू, त्याच्या प्रती समर्पणाची आपली क्रिया म्हणजे श्रद्धा !
४. नितांत श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे !
ही श्रद्धा तत्त्व, वस्तू आणि व्यक्ती इत्यादींवर असू शकते किंवा मग प्रतिमेवरही असू शकते. या व्याख्येचे बारकाईने अवलोकन केले, तर आपल्या लक्षात येईल की, ज्या ज्या व्यक्ती ‘मानव’ म्हणून मोठ्या झाल्या, त्यांच्या जीवनात त्यांनी यांपैकी कुठल्या तरी एका गोेष्टीवर म्हणजेच तत्त्व, व्यक्ती, वस्तू किंवा प्रतिमा इत्यादींवर नितांत श्रद्धा ठेवलेली आढळते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची श्रद्धा सशस्त्र क्रांतीवर होती. भारतमातेलाच ईश्वरत्व अर्पण करून त्यांनी समाजात जे बौद्धिक आक्रमकतेचे स्फुलिंग पेटवले, त्यातून त्यांना महानत्व मिळाले. ‘तत्त्व कुठलेही असले, तरी योग्य हेतूने तुम्ही जर कोणतेही तत्त्व, व्यक्ती, वस्तू अथवा प्रतिमा यांना धरून राहिला आणि त्यावर श्रद्धा ठेवली, तर तुम्हाला महानत्व निश्चित मिळेल’, असे तात्पर्य होय. मग ही तत्त्वे भौतिक जीवनातील किंवा आध्यात्मिक असतील अथवा आणखी कुठली तरी असू शकतील; पण त्यावर तुमची नितांत श्रद्धा हवी, हे निश्चित !
(क्रमश:)
– प.पू. सद्गुरु बापटगुरुजी
(साभार : मासिक ‘संतकृपा’, एप्रिल २०१६)
लेखांक क्र. २ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830900.html