Bangladesh Electricity Dues : बांगलादेशावर भारताच्‍या विद्युत् आस्‍थापनांची ९ सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी !

ढाका – भारताच्‍या विद्युत् आस्‍थापनांची बांगलादेशावर ९ सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. बांगलादेशातील शेख हसीना सरकारच्‍या उलथापालथीनंतर हे पैसे अडकले आहेत. अदानी वीज आस्‍थापनाचे सुमारे ६ सहस्र ७०० कोटी रुपये बांगलादेशाने थकवले आहेत. सध्‍या भारतीय आस्‍थापने बांगलादेशाला उधारीवर वीज पुरवत आहेत.

१. एका वृत्तसंस्‍थेने प्रसिद्ध केलेल्‍या अहवालानुसार बांगलादेशावर ‘अदानी पॉवर’, ‘पीटीसी इंडिया’, ‘एन्.टी.पी.सी.’, ‘एस्.ई.आय.एल्.’ आणि ‘पॉवर ग्रिड’ इत्‍यादी भारतीय आस्‍थापनांची ९ सहस्र ५०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी बांगलादेशाने देणे आवश्‍यक आहे.

२. विद्युत् पुरवठ्याचे पैसे थकबाकी रहाण्‍याच्‍या समस्‍येमागे बांगलादेशातील सध्‍याचे आर्थिक संकटही कारणीभूत आहे. सत्तांतरासह बांगलादेश आर्थिक समस्‍यांशी झुंज देत आहे. बांगलादेशाच्‍या परकीय चलनाच्‍या साठ्यावरही संकट आले आहे. यासाठी बांगलादेशाने आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीकडेही साहाय्‍य मागितले आहे.

३. बांगलादेशात सातत्‍याने हिंदूंविरुद्ध होणार्‍या हिंसा आणि रस्‍त्‍यांवर असलेली अशांतता यामुळे देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवर परिणाम झाला आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्‍या नावाने बोटे मोडणार्‍या बांगलादेशाकडून भारताने हे पैसे वसुल करणे आवश्‍यक !