देशाभिमान आणि आश्रमाची ओढ असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा, गोवा येथील कु. गार्गी अमित पेंडसे (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. गार्गी पेंडसे ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. गार्गी अमित पेंडसे हिची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के आहे.’ – संकलक)

‘श्रावण कृष्ण दशमी (२८.८.२०२४) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. गार्गी अमित पेंडसे हिचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, आजी (आईची आई) आणि काही साधिकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. गार्गी अमित पेंडसे हिला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. गार्गी अमित पेंडसे
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. सौ. चित्रा पेंडसे (कु. गार्गीची आई), फोंडा, गोवा.

सौ. चित्रा पेंडसे

१ अ. नम्रता : ‘कु. गार्गी मोठ्या माणसांशी नम्रतेने आणि आदराने बोलते.

१ आ. कुशाग्र बुद्धी : तिचे मनाचे श्लोक किंवा स्तोत्र लगेच पाठ होते. तिला शाळेतील सर्व विषयात चांगले गुण मिळतात. ती भरतनाट्यम् शिकतांना पहिल्यांदाच शिकवलेल्या नृत्याच्या रचना (‘स्टेप्स’) पटकन ग्रहण करते. घरातील व्यक्ती, नातेवाईक किंवा तिच्या मैत्रिणी यांच्या वाढदिवसाला ती स्वतःच्या हातांनी वेगवेगळी सुंदर भेटकार्डे बनवून देते आणि त्यासाठी ती नवनवीन संकल्पना वापरते.

१ इ. विचारण्याची वृत्ती : गार्गी प्रत्येक कृती मला आणि तिच्या बाबांना विचारूनच करते.

१ ई. प्रेमळ : गार्गीला कुणाचेही मन दुखावलेले आवडत नाही.

१ उ. चुकांची जाणीव असणे : तिच्याकडून चूक झाल्यावर किंवा कुणी तिला चुकीची जाणीव करून दिल्यावर आरंभी तिला राग येतो; पण काही वेळाने तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि ‘आई, मी पुन्हा असे करणार नाही. मला क्षमा कर’, असे म्हणून ती आमची क्षमा मागते.

१ ऊ. धर्माचरणाची आवड : गार्गी शाळेत किंवा कुठे बाहेर जातांना टिकली लावूनच जाते. तिला टिकली लावणे आणि बांगड्या घालणे आवडते. तिला केस बांधलेले आवडतात. ती घरातून बाहेर पडतांना देवाला नमस्कार करून अंगारा लावते आणि घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करते. गार्गी अन्न कधीच वाया घालवत नाही.

१ ए. देवाची ओढ : आम्ही प्रत्येक सोमवारी देवळात जातो. गार्गी  तेथील सर्व देवतांना साष्टांग नमस्कार करून प्रदक्षिणा घालते. ती लहानपणापासूनच सकाळी उठल्यावर, अल्पाहार-जेवण करतांना आणि रात्री झोपतांना देवाला प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करते. प्रार्थना करतांना तिच्या मनात अन्य विचार आले, तर ती पुन्हा प्रार्थना करते.

१ ऐ. राष्ट्रप्रेम

१ ऐ १. चिनी बनावटीची उत्पादने न घेणे : आम्ही तिला ‘चीन हे आपले शत्रूराष्ट्र आहे. त्यामुळे चीनने बनवलेली उत्पादने आपण विकत घ्यायची नाहीत’, असे सांगितले आहे. तेव्हापासून ती तिला कितीही आवडली, तरी चिनी बनावटीची उत्पादने मागत नाही.

१ ऐ २. परकीय पदार्थ न घेता भारतीय पदार्थ खाणे : आम्ही तिला ‘पाव’ हा भारतीय पदार्थ नाही. ‘पाव’ इंग्रजांनी भारतात आणला आहे’, असे सांगितले. त्यानंतर तिला पावभाजी पुष्कळ आवडत असूनही तिने पावभाजी खाण्याचे सोडले. आता ती ‘शेव-बटाटा-पुरी’ आवडीने खाते.

१ ओ. आश्रमाची ओढ : फेब्रुवारी २०२४ पासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आम्ही (मी, यजमान आणि गार्गी) रामनाथी आश्रमात सेवेसाठी जातो. गार्गीला आश्रमात जायला पुष्कळ आवडते. आम्ही कधी बाहेर जातो, तेव्हा ती सतत माझ्या समवेत असते; पण आश्रमात गेल्यावर ती मला सोडून रहाते. आश्रमातील बर्‍याच साधकांशी तिने अल्प कालावधीत जवळीक केली आहे. गार्गी आश्रमातील तिला करता येऊ शकणार्‍या लहानलहान सेवा अगदी मनापासून करते.

१ औ. बालसाधकांच्या सत्संगात भावजागृती प्रयोगाच्या वेळी आलेली अनुभूती : आश्रमात गेल्यावर गार्गी दैवी बालसाधकांच्या सत्संगाला जाते. सत्संगात बालसाधकांकडून भावजागृतीचा प्रयोग करून घेतला जातो. मार्च २०२४ मध्ये एकदा भावजागृतीचा प्रयोग चालू असतांना तिला सूक्ष्मातून एक दृश्य दिसले, ‘ती रामनाथी आश्रमातील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीत त्यांच्यासमोर बसली आहे. ते तिला ‘चुका होऊ नयेत’, यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ‘नामजप का करायला हवा ?’, असे साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत. तेव्हा काही अनिष्ट शक्ती तिथे येऊन तिला म्हणत होत्या, ‘तू नामजप, साधना करू नको, त्यापेक्षा भ्रमणभाष आणि दूरदर्शन बघ.’ त्या वेळी श्रीकृष्ण तिथे आला आणि त्याने सुदर्शनचक्राने सर्व अनिष्ट शक्तींना नष्ट केले.’ हे पाहून गार्गीला आनंद झाला.

‘हे कृपाळू प.पू. गुरुमाऊली, गार्गीला घडवण्याच्या माध्यमातून आमची साधना घडू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

२. सौ. माधवी मोहन पागे (कु. गार्गीची आजी (आईची आई)), डोंबिवली, जि. ठाणे

२ अ. तत्परतेने साहाय्य करणे : ‘माझा पाय दुखत असतांना मी ‘वॉकर’(चालण्यासाठी साहाय्य करणारे साधन) घेऊन चालते. गार्गी आमच्याकडे आल्यावर मला ‘वॉकर’ उघडायला आणि बंद करायला स्वतःहून साहाय्य करते. मी तिला कुठलेही काम सांगितले, तर ती ते तत्परतेने करते.’

३. होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी, नागेशी, गोवा.

३ अ. परिपूर्ण सेवा करणे : ‘एकदा गार्गी काही बालसाधकांसह आश्रमाच्या परिसरातील झाडांना पाण्याच्या नळीने पाणी घालण्याची सेवा करत होती. काही वेळानंतर तिच्या समवेत सेवा करणारे सर्व बालसाधक निघून गेले; पण गार्गीने सेवा पूर्ण केली आणि शेवटी पाण्याची नळीही व्यवस्थित गुंडाळून ठेवली.

३ आ. सात्त्विकतेची ओढ : पूर्वी गार्गी मुंबईला रहात होती; म्हणून एकदा मी गार्गीला विचारले, ‘‘तुला मुंबई आवडते कि गोवा ?’’ ती म्हणाली, ‘‘गोवा.’’  मी तिला विचारले, ‘‘का ?’’ ती म्हणाली, ‘‘इथे आश्रम आहे ना ?’’ ते ऐकून तिला एवढ्या लहान वयात आश्रमाची ओढ आणि सात्त्विकतेची असलेली जाण पाहून मला भरून आले.’

३ इ. कर्तेपणा नसणे : एकदा गार्गीची आई मला म्हणाली, ‘‘आम्हाला वाटते, ‘गार्गीमुळे माझी आणि यजमानांची साधना होते.’’ तेव्हा गार्गी लगेच म्हणाली, ‘‘आईमुळे माझी साधना होते.’’ यातून गार्गीमध्ये अहं किंवा कर्तेपणा नाही’, असे मला वाटते.’

४. सौ. भक्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. गार्गीने बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू इतक्या व्यवस्थित आणि सुंदर असतात की, ‘इतक्या लहान वयात तिने त्या बनवल्या आहेत’, असे वाटतच नाही.’

(सर्व सूत्रांचा दिनांक ८.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक