BLA’s operation herof : ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने १२ ठिकाणी केलेल्या आक्रमणांत १३० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा

क्वेट्टा (पाकिस्तान) – ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (‘बी.एल्.ए.’ने) (Baloch Liberation Army) गेल्या काही घंट्यांमध्ये बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर (Pakistani soldiers) केलेल्या १२ वेगवेगळ्या आक्रमणांमध्ये १३० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे; मात्र पाकच्या सैन्याने केवळ १४ सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे.

१. ‘बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकातील वृत्तानुसार ‘बी.एल्.ए.’ने ‘ऑपरेशन हेरॉफ’ (operation hereof) अंतर्गत बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्या आणि पोलीस चौक्या यांना लक्ष्य केले. ‘बी.एल्.ए.’ने ‘ऑपरेशन हेरॉफ’ हे बलुचिस्तान कह्यात घेण्यासाठी पहिले पाऊल आहे’, असे म्हटले आहे.

२. ‘बी.एल्.ए.’चे प्रवक्ते झीयंद बलोच म्हणाले की, ‘ऑपरेशन हेरॉफ’चा हा पहिला टप्पा होता. तो यशस्वी झाला. आमच्या वेगवेगळ्या पथकांतील ८०० सैनिकांनी या कारवाईत भाग घेतला होता. आमच्या सैनिकांनी बलुचिस्तानमधील अनेक सैनिकी चौक्या आणि छावण्या उद्ध्वस्त केल्या. आमच्या ‘माजीद ब्रिगेड’च्या आत्मघाती सैनिकांच्या पथकाने बेला तळावर २० घंटे नियंत्रण मिळवले. येथे पाकिस्तानी सैन्याचे ६८ सैनिक मारले गेले, तर १२ हून अधिक सैनिक घायाळ झाले.