स्टॉकहोम (स्विडन) – स्विडनमध्ये स्थलांतर धोरणांमध्ये पालट झाल्यानंतर मोठ्या संख्येने भारतीय लोक स्विडन सोडत आहेत. या वर्षीच्या पहिल्या ६ महिन्यांमध्ये स्विडन सोडणार्या भारतियांमध्ये १७१ टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी आणि जून २०२४ या कालावधीत २ सहस्र ८३७ भारतियांनी स्विडन सोडले. गेल्या वर्षी पहिल्या ६ मासांमध्ये १ सहस्र ४६ भारतियांनी स्विडन सोडले होते. वर्ष १९९८ नंतर असे पहिल्यांदाच घडत आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये उल्फ क्रिस्टरसन पंतप्रधान झाल्यानंतर स्थलांतर धोरणात पालट करण्यात आला. त्यांनी कामची अनुमती (वर्क परमिट) आणि व्हिसा यांच्या संदर्भातील नियम कडक केले. अत्यंत कुशल स्थलांतरितांना देण्यात येणार्या ‘वर्क परमिट’च्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी २० टक्के घट झाली.
कॅनडामध्ये आश्रय मागण्याच्या संख्येत भारतियांची वाढ !
स्विडन सोडत असतांना दुसरीकडे कॅनडामध्ये आश्रय मागणार्यांच्या संख्येत भारतियांची वाढ होत आहे. गेल्या ३ महिन्यात भारतीय नागरिकांनी आश्रयासाठी ६ सहस्र अर्ज केले आहेत. हा आकडा वर्ष २०२३ मधील या तिमाहीच्या तुलनेत ५०० टक्के वाढ दर्शवतो.
संपादकीय भूमिकास्विडन अधिकृतपणे स्थलांतर करणार्यांच्या संदर्भात कडक धोरण राबततो, तर भारत घुसखोरांच्या संदर्भात निष्क्रीय रहातो, हे लज्जास्पद ! |