‘गार्ड’ संघटनेला सरकारची हमी
पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.) – सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार आहे. महिला डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी समन्वयक या नात्याने पुढील २ दिवसांत एका महिला डॉक्टरची नियुक्ती केली जाणार आहे, असे आश्वानस आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले. ‘गोवा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन’च्या (‘गार्ड’च्या) शिष्टमंडळाने मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हे निवेदन स्वीकारल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य डॉक्टरांना मिळेल आणि सुरक्षेच्या संदर्भात कोणतीही त्रुटी ठेवली जाणार नसल्याची हमी ‘गार्ड’च्या पदाधिकार्यांना दिली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री विश्वजीत राणे यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर आणि ‘गार्ड’चे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
‘गार्ड’ने निवेदनामध्ये केलेल्या बहुतांश मागण्या सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेशी निगडित आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, काही ठिकाणी विजेच्या दिव्यांची व्यवस्था करणे आणि सुरक्षेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘राज्य मंत्रीमंडळ बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सूत्रे मांडली जाणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला डॉक्टरांना सुरक्षा देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. महिला डॉक्टरांप्रती अशा हीन कृत्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर कायद्याची भीती हवी. सुरक्षा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करतांनाच डॉक्टरांना पूर्ण संरक्षण देणारा कडक कायदाही आम्ही करणार आहोत. कोलकाता येथे जे काही घडले, ते तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: महिला असूनही संवेदनशीलपणे घेतले नाही, तर उलट या प्रकरणी राजकारण आणले, ही निषेधार्ह गोष्ट आहे.’’
उत्तर आणि दक्षिण जिल्हा रुग्णालयांचे ‘ऑडिट’ (परीक्षण) करणार
मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय येथे आवश्यक असलेल्या गोष्टींचे आम्ही ‘ऑडिट’ (परीक्षण) करणार आहे. तेथील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत’’.
भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘माझ्याकडील कोणत्याही खात्यात जर भ्रष्टाचार आढळून आला, तर त्याची गय केली जाणार नाही. बेतकी येथे हल्लीच एका डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले होते, तर नगर नियोजन खात्यातील भ्रष्ट कर्मचार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.’’