सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त येणार्‍या साधकांची निवासव्यवस्था स्वतःच्या घरी भावपूर्ण करतांना आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘जेव्हा मला सद्गुरु सत्यवान कदम यांच्याकडून समजले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त अन्य जिल्ह्यातील साधक आमच्या ‘हॉटेल गुरुप्रसाद’ (विश्रामगृह) येथे येणार आहेत, तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली. (‘हॉटेल गुरुप्रसाद’ मागील ५ – ६ मासांपासून बंद आहे. तेथे रहाण्याची सोय असून विश्रामगृहाच्या वरच्या मजल्यावर आमचे वास्तव्य असते.)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधक घरी येणार; म्हणून विश्रामगृहाच्या स्वच्छतेची सेवा भावपूर्ण करतांना जाणवलेली सूत्रे

१ अ. विश्रामगृहाची स्वच्छता करतांना ‘परम पूज्य समोर असून तेच स्वच्छता करून घेत आहेत’, असा भाव ठेवल्याने कृतज्ञता वाटणे : ५ – ६ मास विश्रामगृह बंद असल्याने तेथे पुष्कळ धूळ होती. मी आणि माझे यजमान यांनी तेथील स्वच्छता करायला आरंभ केला. तेव्हा स्वच्छता करतांना मला जराही ताण आला नाही. पूर्वी वास्तूची स्वच्छता करायची, म्हणजे मला ताण आणि थकवा यायचा; पण या वेळी उत्साह जाणवला, तसेच कृतज्ञतेने माझा भाव दाटून येत होता. ‘परम पूज्य समोर असून तेच आमच्याकडून स्वच्छता करून घेत आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे मला कृतज्ञता वाटत होती.

१ आ. विश्रामगृहाची स्वच्छता भावपूर्ण झाल्याने ४ दिवस स्वच्छतेची सेवा करूनही थकवा न जाणवणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा आपल्या विश्रामगृहातच असून त्यासाठी सर्व साधक येथेच येणार आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे माझ्याकडून भावपूर्ण सेवा होत होती. भगवंताच्या कृपेने ४ दिवसांत स्वच्छतेची सेवा पूर्ण झाली.

देवाच्या कृपेने पू. दीपाली मतकर यांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होऊन भावजागृती होणे

पू. दीपाली मतकर

एक साधकाने सांगितले, ‘‘पू. दीपालीताई (सनातनच्या ११२ व्या संत पू. दीपाली मतकर) येणार आहेत. तेव्हा ‘साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।’ असे मला वाटले. पू. दीपालीताई यांना पहाण्याची, तसेच त्यांना भेटण्याची माझी पुष्कळ इच्छा होती; पण त्या आल्यावर सेवा असल्याने मला त्यांना भेटता आले नाही.
मी आणि माझे यजमान (श्री. श्रीनिवास पै, वय ५८ वर्षे) ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गोव्याला जाणार होतो. आमचा जेवणाचा डबा बनवत असतांना मला अकस्मात् वाटले, ‘पू. दीपालीताई खाली आल्या असतील’; म्हणून मी त्यांना पहाण्यासाठी धावत गेले. तेव्हा त्या मला समोरच दिसल्या. त्यांना पाहून माझा भाव जागृत झाला. – सौ. सीमा श्रीनिवास पै

२. ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी अन्य जिल्ह्यातून पुष्कळ साधक विश्रामगृहावर आल्यावर जाणवलेली सूत्रे

२ अ. विश्रामगृहात साधक आल्यावर ‘यापेक्षा अधिक साधक आपल्याकडे यायला हवेत’, असे वाटणे आणि प्रत्यक्षातही तसेच झाल्यावर आनंद होणे : ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी अन्य जिल्ह्यातून एक बस भरून (४५ साधक) साधक आमच्याकडे येण्याचे नियोजन होते. तेव्हा मला वाटले, ‘यापेक्षा अधिक साधक आपल्याकडे यायला हवेत.’ जेव्हा सद्गुरु स्वातीताईंचा (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा) निरोप आला की, ६ गाड्या भरून साधक तुमच्याकडे येणार आहेत, तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. प्रत्यक्षात पुष्कळ साधक आल्यावर त्यांना पाहून मला आनंद झाला.

२ आ. आलेल्या साधकांची सेवा करतांना ‘सेवा चालूच रहावी’, असे वाटणे : आलेले सगळे साधक पुष्कळ आनंदी दिसत होते. ‘सर्वांना अंघोळीसाठी पाणी गरम करून देणे आणि ‘त्यांना काही अडचण तर नाही ना ?’, हे पहाणे’, या सेवा करत असतांना ‘सेवा चालूच रहावी’, असे मला वाटत होते.

३. सर्व आवरून निघेपर्यंत आम्हाला गोव्याला पोचायला पुष्कळ विलंब झाला, तरीसुद्धा देवाच्या कृपेने आम्ही कार्यक्रमस्थळी वेळेवर पोचलो.

४. कार्यक्रमस्थळी जेव्हा परम पूज्यांचे दर्शन झाले, तेव्हा मला आकाशातून सर्वत्र निळसर प्रकाश पसरलेला दिसला. ते पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती.

साधिकेचा विदेशात असलेला नातू चि. श्रीयान याने ब्रह्मोत्सवाच्या
आदल्या दिवशी ‘दत्त, दत्त…’, असे म्हणणे आणि ब्रह्मोत्सवाच्या दिवशी
परम पूज्यांच्या श्रीरामाच्या रूपातील छायाचित्राला साष्टांग नमस्कार घालणे

‘माझा नातू (माझ्या मुलाचा (श्री. देवीप्रसाद पै, यांचा मुलगा)) चि. श्रीयान देवीप्रसाद पै (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १ वर्ष) विदेशात असतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी मला माझ्या सूनबाईचा (सौ. सिद्धि देवीप्रसाद पै हिचा) भ्रमणभाषवर लघुसंदेश (मेसेज) आला, ‘१०.५.२०२३ या दिवशी चि. श्रीयान पूर्ण दिवस केवळ ‘दत्त, दत्त…’, असे म्हणत होता आणि ११.५.२०२३ या दिवशी परम पूज्यांच्या श्रीरामाच्या रूपातील छायाचित्राला साष्टांग नमस्कार घालत होता.’ कार्यक्रमाच्या दिवशी तिन्हीसांजेच्या वेळी तो देव्हार्‍याकडे पाहून पुष्कळ रडू लागला. तेव्हा माझ्या सुनेने देवापुढे दिवा लावल्यावर तो हसून टाळ्या वाजवू लागला.’
– सौ. सीमा श्रीनिवास पै), कुडाळ, सिंधुदुर्ग. (११.५.२०२३)

५. कार्यक्रम संपल्यावर साधक पुन्हा घरी येणार असल्याचे कळल्यावर देवाप्रती कृतज्ञता वाटणे

सौ. सीमा पै

कार्यक्रम संपल्यावर आम्ही गोव्याहून निघालो. तेव्हा आम्हाला निरोप मिळाला, ‘सकाळी जे साधक आमच्या घरी आले होते, ते सर्व साधक रात्री आमच्याकडे येणार आहेत. आम्ही घरी पोचल्यावर लगेच साधक येण्यास आरंभ झाला. जसजसे साधक घरात येत होते, तसतसे मला पुष्कळच चांगले वाटत होते. रात्री १.३० वाजेपर्यंत साधक घराकडे येतच होते. तेव्हा मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

६. साधकांनी साधिकेच्या घराला ‘आश्रम’ संबोधल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण येऊन कृतज्ञता वाटणे

दुसर्‍या दिवशी कुडाळ सेवाकेंद्रातील साधक आमच्या घरी आले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हा सनातन आश्रमच आहे.’’ तेव्हा परम पूज्यांनी सांगितलेले वाक्य मला आठवले. ते म्हणाले होते, ‘‘प्रत्येक साधकाचे घर हा आश्रमच आहे.’’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

‘देवाच्या कृपेने मला जाणवलेली सूत्रे मी देवाचरणी अर्पण करू शकले’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सीमा श्रीनिवास पै (वय ५४ वर्षे), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (११.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक