Badlapur School Sexual Abuse : सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरले; पालकांचे शाळेसमोर आंदोलन

  • बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण

  • बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली

  • पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

  • आंदोलकांकडून पेट्रोल ओतून शाळेचे वर्ग पेटवण्याचा प्रयत्न

  • पोलिसांकडून लाठीमार, तर आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

पालकांचे शाळेसमोर आंदोलन

ठाणे, २० ऑगस्ट (वार्ता.) – बदलापूर येथील नामांकित शाळेत शिकणार्‍या ४ वर्षांच्या २ बालिकांवर स्वच्छता कर्मचार्‍याने स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याच्या निषेधार्थ २० ऑगस्टला सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून पालकांनी सदर नामांकित शाळेबाहेर आंदोलन चालू केले. आंदोलकांनी पोलीस सुरक्षेचे कडे भेदून शाळेच्या आतमध्ये घुसून तोडफोड केली. या वेळी आंदोलकांनी पेट्रोल ओतून शाळेचे वर्ग पेटवून देण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा अनर्थ टळला. आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी शाळेच्या परिसरात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शाळेच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘शाळेतील लहान मुलींवर अत्याचार करणार्‍याला आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याला शाळेसमोरच जाळू’, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. २० ऑगस्ट या दिवशी ‘बदलापूर बंद’ पाळण्यात आला.

शाळेवर मोर्चा काढून ३ घंटे उलटूनही शाळा प्रशासनाने संवाद न साधल्याने आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकाकडे जात मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली. पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळांवरून हटवण्याचा प्रयत्न केला. बदलापूर येथे संतप्त जमावाने केलेल्या रेल्वे बंद आंदोलनाला हिंसक स्वरूप आले. पोलिसांनी लाठीमार करताच प्रवासी आणि आंदोलनकर्ते यांनी दगडफेक केली केली. प्रवाशांचा संताप पाहून लाठीमार करणार्‍या पोलिसांनी माघार घेतली.

सहकार्याचे तोंडदेखले आश्‍वासन देत शाळेचे अध्यक्ष निघून गेले !

शाळेच्या अध्यक्षांनी आंदोलकांना शांत होण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘‘शाळेत घडलेली अत्याचाराची घटना निंदनीय आणि घृणास्पद आहे. आम्ही पोलिसांना  सहकार्य करत आहोत. प्रशासन आणि मुलीचे पालक यांनाही आम्ही सहकार्य करत आहोत. शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित कशा करता येतील ?, याचा आम्ही विचार करत आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की, तुम्ही कुठल्यातरी गोष्टीचा राग या शाळेवर काढू नका.’’ यानंतर त्यांना रडू आल्याने ते तेथून निघून गेले.

तक्रारदार पालकांना १२ घंटे ताटकळत ठेवणार्‍या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे स्थानांतर !

प्रारंभी शाळेचे प्रशासन आणि पोलीस यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी १२ घंटे ताटकळत ठेवले. या प्रकरणी शितोळे यांचे ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले.

संपादकीय भूमिका

अशा असंवेदनशील पोलिसांना बडतर्फ करायला हवे !

शाळेकडून क्षमायाचनापत्र प्रसिद्ध

शाळेच्या प्रशासनाकडून केवळ क्षमायाचनेचे केवळ एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले. यात म्हटले आहे, ‘‘मुलींवर अत्याचार करणारा स्वच्छता कर्मचारी पुरवणार्‍या कंत्राटदारासमवेतचा करार रहित करण्यात आला आहे. सर्व पालक वर्गाची शाळेकडून जाहीर माफी. घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचार्‍यावर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी संस्था आग्रही आहे. आरोपीविरोधात संस्थेने पूर्ण क्षमतेने पोलिसांना सहकार्य केले आहे.’’

प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विद्यार्थिनींवर अत्याचार करणार्‍या आरोपीला कठोर शासन करण्यात येईल. यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालवावा. याविषयी मी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांविषयी चर्चा केली आहे. अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येईल. या घटनेविषयी मी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना काढण्यास सांगितले आहे. विद्यार्थी किंवा पालक यांना अडचणींसाठी प्रत्येक शाळेत एक तक्रारपेटी लावण्याची सूचना मी दिली आहे. शाळेतील ज्या कर्मचार्‍यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांची पार्श्‍वभूमी माहिती करून घेणे आवश्यक आहे. ‘सखी सावित्री समित्या’ स्थापन झाल्या आहेत कि नाहीत ?, हे पडताळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदलापूर येथील या प्रकरणात शाळेच्या संस्थाचालकांची चूक असेल, तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.

नराधमाला फाशी होण्यासाठी प्रयत्न करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बदलापूर येथील घटनेत २ आरोपींनी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे. घटनेच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अन्वेषण पथक नेमण्यात आले आहे. या घटनेतील नराधमाला फाशी होण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल. या प्रकरणी पोलीस संवेदनशीलतेने काम करत आहेत. दोषींवर कारवाई होण्यासाठी कुणी विलंब केला आहे का ? किंवा घटना कुणी लपवून ठेवली का ?, तक्रारदारांना पोलीस ठाण्यात जाणीवपूर्वक बसवून ठेवण्यात आले का ?, या सर्व गोष्टींची चौकशीही विशेष अन्वेषण पथकाद्वारे केली जाईल.’’

महिलांवरील अत्याचार थांबले, तरच ‘लाडकी बहीण’ म्हणा ! – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’ राबवत आहेत; मात्र राज्यात लाडकी बहीणच सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचार थांबले, तरच ‘लाडकी बहीण’ म्हणा. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. देहलीतील निर्भया बलात्काराप्रकरणी दोषीला फाशी द्यायला विलंब झाला. अशा घटनांचा न्यायनिवाडा लवकरात लवकर व्हायला हवा. पक्षभेद आणि जाती-पाती विसरून सर्वांनी एकत्रित येऊन अशा घटनांना विरोध करायला हवा. महाविकास आघाडीच्या काळात ‘शक्ती’ विधेयकाचा मसूदा संमत करण्यात आला होता; मात्र आमची सत्ता गेल्यामुळे हा कायदा आम्ही आणू शकलो नाही.

कायद्याचे राज्य आहे, तर मग गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी १२ घंटे का लावले ? – राज ठाकरे

या प्रकरणाविषयी राज ठाकरे म्हणाले की, बदलापूर येथीलघटना धक्कादायक आणि संतापजनक आहेत. या घटनेत गुन्हा नोंदवण्यासाठी १२ घंटे का लावले ? एका बाजूला कायद्याचे राज्य म्हणायचे आणि दुसर्‍या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा ? आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे सूत्र लावून धरले आहे. त्यांना माझे सांगणे आहे की, या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत तुमचे लक्ष असू द्या.

संपादकीय भूमिका

  • बलात्कार्‍यांवर कारवाई होत नसल्याच्या भावनेमुळेच जनता आता रस्त्यावर उतरत आहे. पोलिसांना हे लज्जास्पद !
  • सरकारने बलात्कार्‍यांना तात्काळ फासावर लटकवणे, हाच अशा घटना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे !
  • लहान मुली, युवती आणि महिला यांच्यावरील अत्याचार कधी थांबणार ? महिलांना सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !