पुणे – प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पी.एम्.पी.एम्.एल्. (पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित) प्रशासनाने रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने दैनंदिन संचलनात असलेल्या १ सहस्र ७६१ बसगाड्यांसह अतिरिक्त ९१ बस सोडण्याचे नियोजन केल्याने यंदा १ सहस्र ८५२ बस रस्त्यावर धावतील. मागील वर्षी अतिरिक्त बसमुळे एका दिवसात १ कोटी ९५ लाख ५० सहस्र रुपयांचे उत्पन्न पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाला मिळाले होते.
रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्या रहित केल्या आहेत. महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलनाच्या नियंत्रणासाठी अधिकार्यांच्या नेमणुकाही केल्या आहेत. १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी, तसेच बसच्या फेर्या रहित होऊ नयेत, यासाठी महत्त्वाच्या बस आगारात व्यवस्थापकासह विभाग अधिकारी असतील. प्रवाशांच्या सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी अधिकचे मनुष्यबळ वापरले जाईल, अशी माहिती पी.एम्.पी.एम्.एल्.चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.