१७ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी माणगाव (रायगड) येथे आमरण उपोषण !

नागरिकांवर आमरण उपोषणाची वेळ येणे दुर्दैवी !

माणगाव येथे उपोषणाला बसलेले कार्यकर्ते

माणगाव (रायगड) – गेली १७ वर्षे काम चालू असूनही अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, सहयोगी संघटना आणि समस्त कोकणकर यांनी माणगाव येथे आमरण उपोषण चालू केले आहे. महामार्गाचे रखडलेले काम, निकृष्ट दर्जा, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि त्यातून महामार्गावर होणारे अपघात यांमुळे कोकणवासीय संतापले आहेत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. आवश्यकता वाटल्यास रस्ता रोखण्याचा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. या आंदोलनाला कोकणवासीय, माणगाव येथील स्थानिक, सहयोगी संघटना, व्यापारी संघटना आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेईपर्यंत उपोषण चालू ! – समितीची भूमिका

‘मुख्यमंत्री ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत उपोषण चालू राहील’, अशी भूमिका समितीने घेतली. समितीच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन दिले. त्यावर राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सत्ताधारी पक्षातील आमदार किंवा खासदार यांनी येथे भेट न दिल्याची खंत उपोषणाला बसलेल्यांनी व्यक्त केली. दुसर्‍या दिवशीही सरकारने याची नोंद घेतलेली नाही. ‘अजून एक दिवस आम्ही वाट पाहू. तरीही यावर निर्णय झाला नाही, तर रस्ता रोखण्यात येईल’, अशी चेतावणी समितीच्या वतीने देण्यात आली आहे.