RG Kar Hospital Attack : घटना घडलेल्या आर्.जी. कार रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड

  • कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या केलेल्या हत्येचे प्रकरण

  • तोडफोडीमागे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ?

कोलकाता (बंगाल) – येथील आर्.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेवरून देशभरात आंदोलने चालू आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने या घटनेचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवल्यानंतर दुसर्‍याच दिवशी या रुग्णालयावर ४० हून अधिक जणांच्या जमावाने आक्रमण करून प्रचंड तोडफोड केली. १४ ऑगस्टला रात्री उशिरा हे आक्रमण करण्यात आले. त्यांनी पोलिसांवरही आक्रमण केले. या वेळी आक्रमणकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर शेकडोंच्या संख्येने लोक गोळा झाले. आक्रमण करणारे कोण होते ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते पोलिसांना ठार मारण्याची धमकी देत होते, असे पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. यावरून आक्रमणकर्ते आंदोलक नव्हते, तर गुंड होते, असे लक्षात येते. हे आक्रमण महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराचे पुरावे नष्ट करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

१४ ऑगस्टला रात्री ११.५५ वाजता ‘रिक्लेम द नाईट’ मोहिमेचा भाग म्हणून रुग्णालयाबाहेर निदर्शने चालू होती. फलक घेऊन पीडितेला न्याय देण्याची मागणी करत समाजाच्या सर्व स्तरातील सहस्रो महिला रस्त्यावर उतरल्या. ही निदेर्शने अत्यंत शांतपद्धतीने चालू होते; परंतु काही वेळातच या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. येथे लोवलेले अडथळे (बॅरिकेड्स) जमावाने बलपूर्वक तोडून रुग्णालयात प्रवेश केला आणि तोडफोड केली. जमावाने रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डची, तसेच बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या काही वाहनांचीही तोडफोड केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

तोडफोडीला आंदोलन उत्तरदायी ! – पोलीस आयुक्त

कोलकाताचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी या तोडफोडीसाठी सामाजिक माध्यमांवरील मोहिमेला उत्तरदायी ठरवले आहे. ते म्हणाले की, येथे जे घडले ते सामाजिक माध्यमांवरील चुकीच्या मोहिमेमुळे घडले आहे, जे दुर्दैवी आहे. कोलकाता पोलिसांनी काय केले नाही ? आम्ही या प्रकरणात सर्व काही केले आहे. आम्ही महिला डॉक्टरच्या कुटुंबाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु आमच्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. मी फार अप्रसन्न आहे. आम्ही काहीही चुकीचे केले नाही.

संपादकीय भूमिका

पोलिसांच्या उपस्थितीत एका रुग्णालयाची तोडफोड केली जाते, यावरून बंगालच्या पोलिसांविषयी संशय निर्माण होतो. पोलीस सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे बटिक असल्याप्रमाणेच आतापर्यंत वागत आले आहेत. बंगालच्या जनतेचे रक्षण करण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे !